पनवेल । तीन दिवसांपूर्वी 5 पोलीस कर्मचारी कोरोनावर मात करुन कर्तव्यावर हजर झाले असताना, तो आनंद कळंबोली पोलीस ठाण्यात फारसा टिकला नाही. याठिकाणी नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश म्हात्रे यांचा कोरोना महामारीने सोमवारी (31 ऑगस्ट) मृत्यू झाला. त्यामुळे कळंबोली पोलिसांवर शोककळा पसरली आहे. डॉक्टर आणि नवी मुंबई पोलिसांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही म्हात्रे यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे.
कायम हसतमुख चेहरा असलेले सुरेश म्हात्रे मुंबई पोलीस दलात परिचित होते. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी कर्तव्य बजावले तिथे सर्वांना आपलेसे केले. अत्यंत प्रेमळ, मितभाषी संवेदनशील आणि मनमिळावू असे हे खाकी वर्दीतील व्यक्तिमत्त्व होते. पनवेल शहर पोलीस ठाण्यातही त्यांनी काम केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांना बढती मिळाली होती. त्यांची नेमणूक कळंबोली पोलीस ठाण्यात होती. 22 ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे म्हात्रे यांना डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.
पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्यासह इतर अधिकारी सुरेश म्हात्रे यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते. नवी मुंबई पोलीस दलातील वेलनेस टीम याकरिता समन्वय ठेवून होती. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचार्यांनी आपल्या सहकार्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, ते ठणठणीत बरे होऊन पुन्हा कर्तव्यावर रुजू व्हावेत, यासाठी प्रार्थना करीत होते.
डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय टीमने प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र सुरेश म्हात्रे यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही. शेवटी 31 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आणि या प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सहाय्यक फौजदाराची कोरोना विरोधातील लढाई संपली. ते पेण तालुक्यातील आमटेम गावातील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या निधनाबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, अत्यंत शोकाकूल वातावरणामध्ये त्यांच्या पार्थिवावर पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातील काही निवडक कर्मचारी उपस्थित होते.