उरणच्या हर्षिती भोईरची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

Raigad Times    12-Sep-2020
Total Views |
 
  • आतापर्यंत 13 गड आणि 25 ट्रेक केल्या यशस्वी

अनंत नारंगीकर/जेएनपीटी । लोणावळा येथील पाच गड एकाच दिवशी सर करणार्‍या आणि साडेचार वर्षांची असताना महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसूबाई शिखर सर केलेल्या उरणच्या हर्षिती भोईर या चिमुरड्या ट्रेकरची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या कामगिरीबद्दल तिच्यावर तालुकाभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

उरणच्या भेंडखळ या छोट्याशा गावात राहणार्‍या कविराज भोईर या सिडको कर्मचार्‍याची हर्षिती मुलगी. लहानपणापासूनच तिला ट्रेकींगची आवड लागली. चार वर्षाची असताना तिने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर फक्त 3 तास 35 मिनिटांत सर केले. त्यानंतर 26 जानेवारी 2020 ला लोणावळा येथील श्रीवर्धन गड, मनोरंजन गड, लोहगड, विसापूर आणि तिकोना हे पाच गड एका दिवसात सर करण्याचा विक्रम केला. 11 तास 39 मिनिटांत हे पाच गड तिने सर केले होते.

पावणेसहा वर्षीय हर्षितीने आतापर्यंत 13 गड आणि 25 ट्रेक यशस्वी केल्या आहेत. तिच्या या कामगिरीची नोंद यापूर्वी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली होती. आता नुकतीच तिच्या या पराक्रमाची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे.