विराज टिळक / तळा | किरकोळ कारणावरुन एका तरुणाने बापाची चोपण्याने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना तळा येथे घडली आहे. गेल्या महिन्यात दोन हत्या झाल्या होत्या.
तालुक्यातील वरळ येथील भागूराम काप (५५) आणि त्याचा मुलगा भावेश (३१) यांच्यासोबत राहतो. घरातील इतर मंडळी कामानिमित्त मुंबईमध्ये राहतात. सोमवारी (१८ जानेवारी) रात्री या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. भावेश वडिलांकडे त्याचा मोबाईल मागत होता. ते देत नसल्यामुळे दारुच्या नशेत असलेल्या भावेशने घरातील चोपण्याने वडिलांवर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.
भागुराम यांचे मित्र, शेजारी यांनी भावेशकडे वडिलांची चौकशी केली असता, त्याने घडलेली घटना सांगितली. मोठा अनर्थ झाल्याचे लक्षात येताच या शेजार्यांनी ही माहिती गावचे अध्यक्ष, पोलीस पाटील व त्यानंतर तळा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी भावेशला ताब्यात घेतले आहे.
भावेश याचे लग्न झाले असून त्याला दोन मुलं आहेत. लॉकडाऊनपासून तो गावी येवून राहिला होता. सोमवारी किरकोळ कारण आणि दारुच्या नशेमुळे वडिलांचीच हत्या करुन बसला. या घटनेचा तपास तळा पोलीस करीत आहेत.