पाली/बेणसे | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड किल्ल्याला आता राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार आहे. यामुळे किल्ल्याचे रुप पूर्णपणे पालटणार असून, येथील देदीप्यमान इतिहास उजेडात येणार आहे. याशिवाय पर्यटनवाढीसह तालुक्यातरोजगार वृद्धीही होणार आहे. यामुळे स्थानिकांसह इतिहास अभ्यासक व दुर्गप्रेमी सुखावले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी ५-६ किल्ले निवडले आहेत. पथदर्शी स्वरुपात हे किल्ले निवडून या किल्ल्याचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी समितीदेखील नेमली आहे. कोकणातील सुधागड, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या ३ किल्ल्यांचा त्यात समावेश आहे.
रायगड जिल्ह्यातील ‘सुधागड’ हा एकमेव किल्ला निवडण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे किल्ले केंद्राने संरक्षित केले आहेत. मात्र सुधागड किल्ला अजूनपर्यंत असंरक्षित असल्याने त्याला संरक्षित केले जात आहे. त्यानुसार राज्य सरकारने राज्य पुरातत्व विभागास सुधागड किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषितकरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्य पुरातत्त्व विभागाने मंत्रालयात नोटिफिकेशन पाठविले आहे. सुधागड किल्ल्याचा जतन दुरुस्ती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने राज्य पुरातत्व विभाग सहाय्यक संचालक विलास वाहणे व त्यांच्या टीमने सुधागड किल्ल्याची तेथील वास्तू व जाणार्या मार्गांची पाहणी केली. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यावर लवकरच किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात येणार आहे, असे विलास वाहणे यांनी सांगितले.
पर्यटन विकास होणार सुधागड किल्ला संरक्षित झाल्यानंतर येथे पर्यटन विकासाला अधिक चालना मिळेल. रोजगार वृद्धी होईल. विविध निधी उपलब्ध होतील आणि सर्वांगीण विकास घडेल. पर्यटन वाढीसाठी पर्यटन विभाग या ठिकाणी विविध योजना राबवू शकते. किल्ले रायगडप्रमाणे येथे रोप-वेदेखील होऊ शकते. किल्ल्याचा पायरी मार्ग केला जाईल. किल्ल्याचे रुप पालटेल. दुर्गप्रेमी, दुर्गसंवर्धन संस्थांचे सहकार्य घेऊन ही कामे केली जातील.
सुधागड किल्ल्याचा इतिहास...
सुधागड किल्ला इ.स. १६४८ मध्ये नारो मुकूंद यांनी मुघलांकडून जिंकून घेतला आणि सुधागड किल्ला शिवरायांच्या स्वराज्यात दाखल झाला. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ६२० मीटर आहे. सुधागड किल्ल्याच्या सखल भागाचे क्षेत्रफळ सुमारे ५५ हेक्टर आहे.
किल्ल्यावर कसे जाल?
पालीवरुन १२ किमीवर नाडसूर हे गाव आहे. नाडसूरकडे जातांना पूर्वेकडे दीड किमीवर धोंडसे गावावरुन चालत सुधागडवर जाता येते. साधारण दोन तास चालत जावे लागते. वाटेत नदी ओलांडावी लागते. किल्ल्यावर जाताना तीन मुख्य दरवाजे लागतात. गडावर जाणार्या पायर्या आता पूर्णपणे कोसळलेल्या आहेत. सुधागडवर पाश्चापूर-दर्यागाव गावावरुनही जाता येते. पालीपासून पाच्छापूर साधारण १५ किमीवर आहे. तेथे जाण्यासाठी पालीवरुन एसटी व मिनीडोर आहेत. पाच्छापूर मार्गे जातांना सरळ चढण व एक लोखंडी शिडी चढून किल्ल्यावर जावे लागते. पण या मार्गावरुन लवकर पोहचता येते.
किल्ल्यावर काय पाहाल?
किल्ल्यावर पंत सचिवांचा सरकार वाडा, दोन मोठी तळी, धान्य कोठार, घरांचे अवशेष, पाण्याच्या टाक्या व हौद आहे. घोडेपागा, अंबरखाना, सदर विभाग, बारुद खाना, भुयारी मार्ग, तटबंदी ही ठिकाणे अर्धवट स्थितीत आहेत. शत्रूला कडेलोट करण्यासाठी टकमक टोक आहे. शंकराचे देऊळ तसेच भोराई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या देवीच्या नावावरुन या किल्ल्याला ‘भोराई गड’ही बोलले जाते. तसेच पूर्वी येथे भोर संस्थान असतांना याला भोरप्याचा डोंगर किंवा ‘भोरपगड’ही म्हटले जायचे. नवरात्रीच्या वेळी येथे प्रचंड गर्दी असते. येथे नऊ दिवस भोराई देवीचा मोठा उत्सव चालतो.
-------------------------------------------------------------------------------------------------
किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी नोटीफिकेशन काढण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठविला आहे. प्रथम नोटीफिकेशन निघाल्यानंतर कोणी हरकती घेतल्या नाही तर फायनल नोटीफिकेशन निघेल व साधारण २-३ महिन्यांत सुधागड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मार म्हणून घोषित करण्यात येईल व पुढील कामांना सुरुवात होईल. - विलास वाहणे, सहाय्यक संचालक, राज्य पुरातत्व विभाग
----------------------------------------------------------------------------------------------------
सुधागड किल्ला संरक्षित झाल्यास किल्ल्याचा इतिहास सर्वांसमोर येईल. पर्यटन विकासाला चालना मिळेल. त्याद्वारे आपोआप सुधागड तालुक्याचा विकास साधला जाईल. - दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड
-----------------------------------------------------------------------------------------------------
सुधागड किल्ल्याला खूप मोठे ऐतिहासिक महत्व आहे. किल्ला संरक्षित झाल्यास येथील इतिहास सर्वदूर पोहचेल. तसेच पर्यटन वाढीला चालना मिळेल. रोजगार निर्मिती होईल. - उमेश तांबट, मालक, सुधागड ट्रेकर्स