खोपोली (योगेश वाघमारे) । ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये खोपोली नगरपरिषदेला पुरस्कार प्राप्त झाला आहे. आरोग्य कामगार, कर्मचारी, सफाई कामगार, अधिकारी यांच्यासह खोपोली शहरातील नागरिकांच्या सहकार्यातून हा पुरस्कार प्राप्त झाल्याने नगरपरिषदेच्यावतीने कर्मचारी व कामगारांचा सन्मान सोहळा पालिका कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम शुक्रवारी (12 नोव्हेंबर) पालिका प्रशासकीय इमारतीत उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नगराध्यक्षा सुमन औसारमल, आरोग्य सभापती अर्चना पाटील, महिला व बाल कल्याण सभापती निकिता पवार, गटनेते सुनील पाटील, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, नगरसेवक दिलीप जाधव, नितीन मोरे, अमोल जाधव, राजू गायकवाड, नगरसेविका माधवी रिठे, जिनी सॅम्युअल, अपर्णा मोरे, यांच्यासह पालिका अधिकारीवर्ग उपस्थित होता.
सफाई कामगार, आरोग्य विभागाचे कामगार, कर्मचारी, आम्रपाली महिला बचत गट भानवज बौध्दवाडा, सेवा फाऊंडेशन कुमार, सद्गुरु ग्राफिक्सचे अमित खिसमतराव, साई गणेशचे हिमांशू यादव यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 10 वा क्रमांक आल्याने नगरपरिषदेला पुरस्कार मिळाला आहे. दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा होणार आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी सर्वांचे आभार मानले आपले शहर भविष्यातही अशाप्रकारे स्वच्छ ठेवताना असा सहभाग घेऊन याहूनही मोठे पुरस्कार खोपोली नगरपरिषदेस कसे मिळतील, यासाठी प्रयत्न व सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ नगरसेवक औसरमल यांनीही आरोग्य खात्यातील प्रामाणिक कर्मचार्यांचे कौतुक करताना, इतरांनीही त्यांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. गटनेते सुनील पाटील यांनीही स्वच्छता कर्मचार्यांचे अभिनंदन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सुर्वे यांनी केल. तर आभार प्रदर्शन गजानन जाधव यांनी केले.