कोर्लई (राजीव नेवासेकर) । महाराष्ट्र शासन वन्यजीव विभाग ठाणे व ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उपवनसंरक्षक व्ही.एन.पिंगळे व एन.एन.कुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड अभयारण्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले व सहकार्यांनी नुकतीच पक्षीगणना केली. या पक्षीगणेत तीन दिवसांत 155 प्रजातींची नोंद झाली.
महाराष्ट्र शासन वन्यजीव विभाग ठाणे व ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ते 31 ऑक्टोबर या तीन दिवसीय आयोजित पक्षीगणनेत 155 प्रजातींची नोंद झाली. तसेच 17 प्रजातींचे साप, 12 उभयचर प्राणी, 16 सस्तन प्राणी, 25 प्रजातींचे कोळी, 14 सागरी जीव आणि 50 प्रजातींची फुलपाखरे यांचीदेखील नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे यावेळी भारतातील सर्वांत मोठे फुलपाखरु ‘भीमपंखी’ हेदेखील पक्षीगणनेदरम्यान पाहण्यात आले. हे फुलपाखरु देशात दापोलीपासून दक्षिण किनारपट्टी व पश्चिम घाटात दिसते. तसेच दक्षिण पूर्व घाटातील काही भागातही भीमपंखी फुलपाखरु आढळून येते.
सुमारे वीस वर्षांपूर्वी फणसाड वन्यजीव अभयारण्यात भीमपंखी फुलपाखराचे दर्शन झाल्याचे ऐकिवात होते.परंतु 30 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजत पक्षीगणनेदरम्यान भीमपंखी फुलपाखरे प्रत्यक्षात दिसून आली. ही फणसाड अभयारण्यातील या फुलपाखरांची सर्वात पहिली नोंद आहे.