अलिबाग । तालुक्यातील मान तर्फे झिराड या ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. शिवसेनेच्या अस्मिता अनिल म्हात्रे या सरपंचपदी विराजमान झाल्या असून काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राकेश पाटील हे उपसरपंच म्हणून निवडून आले आहेत.
मान तर्फे झिराड या ग्रामपंचायतीवर आधी शिवसेनेचीच सत्ता होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे पाच, शेकाप-काँग्रेस आघाडीचे पाच तर राकेश पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. अपक्ष उमेदवार परंतू मुळचे काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले राकेश पाटील यांच्या हातात सरपंचपदाच्या चाव्या गेल्या होत्या.
या ग्रामपंचायतीमध्ये शेकाप आणि काँग्रेसची आघाडी होती. त्यामुळे राकेश पाटील शेकापला मदत करतील, असा विश्वास शेकापला वाटत होता. त्यांनी मान तर्फे झिराड ग्रामपंचायत घेतल्याची घोषणादेखील केली होती. प्रत्यक्षात आज बुधवारी ( 10 फेब्रुवारी) सरपंचपदाच्या निवडीत राकेश पाटील यांनी शिवसेनेला साथ दिली आहे.
त्यामुळे ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच ग्रामस्थांनाही धन्यवाद देत, गावात भरीव विकास कामे करण्याची ग्वाही दिली आहे.