उरण : पर्यटकांना भुरळ घालणारे निसर्ग रम्य ‘रानसई धरण’

22 Feb 2021 15:57:24
Ransai dharan_1 &nbs
 
जेएनपीटी । उरण तालुक्यातील गव्हाण फाटा-चिरनेरकडे जाताना दिघोडे गाव फाटा लागतो. या फाट्यावरून पूर्वेकडे रानसई धरणाचा रस्ता जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कंटेनर यार्ड, फार्महाऊस झाले आहेत. धरण आवाराच्या गेटपर्यंत गाडी जाते. धरण व्यवस्थापनाची परवानगी घेऊन धरण पाहता येते. अनेक टेकड्यांच्या कुशीत हे सुंदर निसर्गरम्य धरण वसले आहे.

Ransai dharan 2_1 &n 
 
रानसई धरण आवारात जलशुध्दीकरण यंत्रणा आहे. आजूबाजूला सुंदर बगीचे तयार करण्यात आले आहेत. एक डांबरी रस्ता डोंगराच्या कडेने धरणाच्या एका टोकावर जातो. धरणाच्या मधल्या भागात वर पर्यंत जाण्यास लोखंडी जिना केलेला आहे. धरणावर पोहचल्यावर पाण्याचा पसारा आणि हिरवे डोंगर/टेकड्यांच्या प्रदेश पाहून मन हरकुन जाते. अशा डोंगर परिसरात पाहिले असता कर्नाळा किल्ला पर्यंत नजर जाते. धरणाच्या पाण्यात मासे पकडणार्‍या होड्या दिसतात. स्थानिक लोक मासे पकडतात. ‘गळ’ टाकून मासे पकडण्यास परवानगी आहे. काला मासा, शिवडा, करवाला (खवल्या), कटला, रोहू मासे मिळतात. पावसाळ्यात धरण परिसरात डोंगरातील ‘गोर्‍या चिंबोर्‍या’ सापडतात.
 
एम.आय.डि.सी.चे हे धरण आहे. या धरणाची जल धारण क्षमता 1000 कोटी लिटर म्हणजे 10 एम. सी. एम. इतकी आहे. 1971 साली धरणाची उंची 100 फुट होती. 1981 साली ती 120 फुट करण्यात आली आहे. धरण लांबी 770 फुट, ओव्हर प्लोसेक्शन 300 फुट आहे. धरणाचे क्षेत्र 3712 एकर आहे तर बाधित क्षेत्र 4350 एकर आहे. जी.टी.पी.एस., ओ.एन.जी.सी., उरण शहर आणि 25 गावांना येथून पाणी पुरवठा केला जातो. दरवाज्यांची संख्या 15 आहे. पावसाळ्यात धरण भरुन वाहू लागले की धरणातील पाणी पाणी लहान नदीत सोडण्यात येते. या नदीकिनारी पावसाळ्यात लोक मौज करण्यासाठी गर्दी करतात.
 
रानसई धरणाच्या प्रवेशद्वारांजवळील गेटच्या बाहेर गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर मोठी सावलीसाठी शेड असून तिथे बसण्यासाठी सुविधा आहे. इथे दर्शन घेऊन वनभोजन करता येईल. इथल्या रानवाटेने आदिवासी लोक लाकडी मोळ्या डोक्यावर घेऊन जाताना दिसतात. ‘गळ’ टाकून मासे पकडण्याच्या छंद असलेल्या लोकांना हे धरण आनंदाची पर्वणी आहे.रानसई धरण परिसरात शासनाने जल पर्यटनाची सुविधा केल्यास हे धरण लोकप्रिय होईल, रोजगार वाढणार आहे.त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0