राज्य फुल, पक्षी, प्राणी व फुलपाखरू यांचे वास्तव्य; निसर्ग पर्यटनाला वाव
पाली/वाघोशी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भिरा व पाटणुस भागात पुन्हा एकदा जैवविविधता बहरलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक लुप्त होणाऱ्या प्राणी व वनस्पतींच्या प्रजातींसह राज्य फुल, पक्षी, प्राणी व फुलपाखरू यांचे वास्तव्य येथे पहायला मिळत आहे. त्यामुळे हा परिसर जैविविधतेसाठी नंदनवन ठरत आहे. परिणामी निसर्ग पर्यटनाला वाव देखील आहे.
येथील स्थानिक पशुपक्षी व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी 10 वर्षाहून अधिक काळ केलेला अभ्यास व निरीक्षणावरून अनेक याबाबत आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत.
त्यांना गेल्या काही दिवसात दुर्मिळ प्रजातीच्या विविध पक्षांचे दर्शन झाले आहे. यात थोरला धनेश (Great Pied Hornbill), मलबारी धनेश(Malabar Pied Hornbill), राखी धनेश (Indian Greay Hornbill),मलबारी करडा धनेश (Malabar Grey Hornbill) यांचा समावेश आहे. तसेच मागील आठवड्यात या ठिकाणी 24 दुर्मिळ पांढऱ्या पाठीची गिधाडे व भारतीय गिधाडे मुंढे यांना आढळून आली होती.
या पक्षांबरोबरच आणखी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल, राज्य पक्षी, राज्य प्राणी व राज्य फुलपाखरू हे देखील भिरा-पाटणुस याच भागात आढळून येते.
देवकुंड हा उंचावरून कोसळणारा धबधबा याच भागात आहे. यामुळे पर्यटकांची या भागात सतत ये-जा चालू असते असे असून देखील गेल्या काही दिवसांत या भागात वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडावर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल (Yellow footed green-pigeon) दिसून येत आहे. तर भिरा भागात दाट झाडीमध्ये महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू (Indian giant squirrel) आवाज करत करत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत फिरतांना दिसून येतो. तर महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू ब्ल्यू-मॉरमॉन हे देखील येथे आढळून येते.
भिरा येथून उगम पावणाऱ्या कुंडलिका नदीच्या तीरावर भिरा-पाटणुस या भागात एप्रिल महिन्यात ऐन वैशाख महिन्यात महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल ज्याला ताम्हण किंवा मोठा बोंडारा या नावाने ओळखले जाते, हे गुलाबी रंगाचे फुल रखरखत्या उन्हात आपल्या सौंदर्याने लक्ष आकर्षित करून घेते.
दुर्मिळ धनेशचे वास्तव्य
थोरला धनेश हा अतिशय सुंदर पक्षी असून तो आपल्या सुंदर रंगानी लक्ष वेधून घेतो. हा पक्षी BNHS म्हणजेच Bombay Natural History Society या पक्षांवर संशोधन करणाऱ्या संस्थेचे मानचिन्ह आहे. हा पक्षी आफ्रिकेत सहाराच्या दक्षिणेस व दक्षिण आशिया भारतापासून फिलिपाइन्स बेटापर्यंत आढळतो. भारतात धनेशच्या पाच-सहा जाती आहेत त्यापैकी चार जाती भिरा- पाटणुस या भागात आढळून आल्या आहेत. या पक्षांचा विणीचा हंगाम एप्रिल ते जून असा असतो. या मुळे हे चार विविध प्रकारचे धनेश पक्षी वड, पिंपळ, उंबर या झाडांची फळे चाखण्यासाठी एकत्र थव्याने दिसून येत आहेत. नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी या झाडावर बसून त्यांना चोचीच्या सहाय्याने फळे भरवताना दिसून येत असल्याने हे पाहणे निश्चितच पर्यावरण प्रेमींसाठी सुखद बाब आहे. या पक्षांचे अस्तित्व ज्या भागात असते तो भाग जैवविविधतेच्या दृष्टीने सुसंपन्न असतो असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ही सर्व जैवविविधता कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मी बरीच वर्षे मेहनत घेतली आहे. सतत जंगलात भटकंती केल्यामुळे हा पर्यावरणाचा ठेवा जगासमोर येण्यास मदत झाली आहे. भविष्यात हा अनमोल ठेवा असाच समृद्ध ठेवायचा असेल तर त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे.
- राम मुंढे, स्थानिक पशुपक्षी व निसर्ग अभ्यासक