स्कूल बसची ट्रॅक्टरला धडक; तरुणाचा मृत्यू, 2 जखमी
उतेखोल/माणगांव । माणगाव शहरात कचर्याच्या ट्रॅक्टरला शाळेच्या बसने धडक दिल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. महेश सकपाळ असे या मृत तरुणाचे नाव आहे. एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आज (3 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊच्या वाजण्याच्या सुमारास माणगाव नगरपालिकेचा ट्रॅक्टर कचरा गोळा करत माणगांव निजामपूर मार्गावरील टेंबे नाका येथे कचरा गोळा करण्यासाठी आला होता. यावेळी माणगांवकडे येणार्या स्कूल बसच्या चालकाने या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेने ट्रॅक्टरमधील जयेश नंदकुमार जाधव (वय 24, रा.उत्तेखोल), अनिल नारायण सुर्वे (वय 52, रा.खरोशी) आणि महेश दत्तू सकपाळ (वय 19, रा.उत्तेखोल) हे तिन्ही कर्मचारी जमिनीवर कोसळले. या तिघांनाही माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान महेश सकपाळ या तरुणाचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच याप्रकरणी स्कूल बसचालक नझीर इब्राहीम गालसूरकर (रा. दहिवली) याच्याविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक कावळे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, महेश हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर उतेखोल गावासह माणगाव शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.