माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे व माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी केले स्वागत
पनवेल । पनवेलचे माजी उपनगराध्यक्ष आणि खांदा वसाहतीतील ताकतवान स्थानिक नेते गणेश पाटील यांनी भाजपचे आपल्या हातातील कमळ सोडून गळ्यात लालबावटा घातला. मंगळवारी सायंकाळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे व पेणच माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे वसाहतीत पक्षाला एक प्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. भाजपला काही प्रमाणात या ठिकाणी धक्का बसला आहे.
पनवेल परिसरात कॉस्मोपॉलिटन लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे सहाजिकच राष्ट्रीय पक्षाचा प्रभाव तुलनेत जास्त आहे. नागरीकरण आणि शहरीकरणाचा सर्वाधिक फटका शेतकरी कामगार पक्षाला बसला. दीड दशकांपुर्वी पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकत होती. पन्नास वर्ष या भागात लाल बावट्याचा प्रभाव राहिला. गेल्या काही वर्षांमध्ये शहरी भागात पक्षाला काही धक्के बसले. अनेक जण भारतीय जनता पक्षामध्ये गेले. विशेष करून नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत पक्षाची ताकत कमी झाली. दरम्यान मंगळवारी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला.
त्यामुळे वसाहतीत लाल बावटयाला नक्कीच फायदा होणार आहे. सलग 15 वर्षे नगरसेवक म्हणून पाटील यांनी काम केले. एक वर्ष ते पनवेल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष होते. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पत्नी कुसुम पाटील यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी दिली. नगरसेविका म्हणून त्या अत्यंत प्रभावी काम करीत आहेत. तांत्रिकदृष्ट्या पुढील एक वर्ष त्यांना भाजप नगरसेविका म्हणूनच राहावे लागणार आहे. मात्र मनाने त्या आता शेतकरी कामगार पक्षांमध्ये आलेल्या आहेत. पक्षप्रवेश कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, पक्षाचे माजी तालुका सरचिटणीस नारायण घरत, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल जिल्हा सरचिटणीस गणेश कडू, विजय काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------
दांडगा जनसंपर्क असलेला कार्यकर्ता
गणेश पाटील यांची ओळख सांगायची झाली.तर ते तळागाळात जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत. उत्तम नगरसेवक कसा असावा हा त्यांच्याकडून वस्तुपाठ घेण्यासारखा आहे. प्रत्येक घरामध्ये संपर्क असणारा मोठा लोकसंग्रह जमा करणारा स्थानिक नेता म्हणून त्यांची ओळख आहेत. सतत लोकांसाठी उपलब्ध राहणार लोकप्रतिनिधी म्हणून सुध्दा त्यांच्याकडे पाहिले जाते. काही सामाजिक संस्थांची स्थापना करून त्या माध्यमातून ते काम करत आहेत. तीन वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले. त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका आहेत. कार्यक्षमता कार्यतत्परता आणि स्वतः रस्त्यावर उतरून काम करणार ते स्थानिक नेतृत्व आता शेतकरी कामगार पक्षात गेले असल्याने भाजपला खांदा वसाहतीत फटका बसला आहे.
काय होती गणेश पाटील यांची नाराजी?
खांदा वसाहतीतील प्रभावी असे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांना उपनगराध्यक्ष पद सुद्धा देण्यात आले होते. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून गणेश पाटील यांच्या ऐवजी शेतकरी कामगार पक्षातून आलेल्या संजय भोपी यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले होते. तेव्हाच पाटील यांची नाराजी उघड झाली होती. परंतु पक्ष नेतृत्वाने मनधरणी करून त्यांच्या पत्नी कुसुम पाटील यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून गणेश पाटील पक्षात फारसे रमलेले दिसून आले नाही.
सतरा वर्षांनी स्वगृही परतले
2004 साली माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकला आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत पनवेल नगरपरिषदेचे सात नगरसेवक हे काँग्रेस पक्षामध्ये आले. त्यामध्ये गणेश पाटील यांचा समावेश होता. सतरा वर्षे सोबत राहिल्यानंतर पाटील यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची मंगळवारी एक प्रकारे साथ सोडली.दीड दशकानंतर ते स्वगृही परतले.