- 6 बैलगाड्या जप्त; गोरेगांव पोलिसांची कारवाई
गोरेगांव (प्रसाद गोरेगांवकर) । बैलगाडी शर्यतींना सर्वोच्च नायालयाने बंदी घातलेली असताना आणि संपूर्ण देश कोरोनासारख्या महामारीशी झुंजत असताना माणगाव तालुक्यातील दहिवली कोंड येथे मंगळवारी (२० एप्रिल) बैलगाडी शर्यतींचे आयोजन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून या शर्यतीचे आयोजन करणार्यांच्या गोरेगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, स्पर्धकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील दहिवली कोंड येथे या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळताच गोरेगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल अवसरमोल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व अन्य पोलीस कर्मचार्यांनी याठिकाणी छापा मारला.
यावेळी तेथे शर्यतीसाठी आलेल्या सहा बैलगाड्या तसेच बैलगाडी चालवणारे जॉकी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सहा बैलगाड्या जप्त केल्या असून, सहा जणांना अटक करण्यात आली आहे. कोरोनाचे नियम धाब्यावर बसून शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी आलेले जवळपास 50 अधिक लोक पळून गेले.
दरम्यान, या घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत.