ग्रीन पार्क इमारतीतील तरुण, सिस्केपचे सदस्य व वन विभागाची कौतुकास्पद कामगिरी
महाड : मासे मारण्याच्या जाळ्यात अडकलेल्या मगरीची शहरातील ग्रीन पार्क इमारतीमधील तरुण आणि सिस्केपच्या सदस्यांनी सुखरुप सुटका करुन वन विभागाच्या मदतीने तिला सुरक्षित ठिकाणी सोडले.
ग्रीन पार्क इमारतीनजीक नदी पात्रात बुधवारी (12 मे) मासेमारी करणार्या एका इसमाने जाळ्यात एक मगर अडकून पडल्याची माहिती या सोसायटीमधील बाबू कदम, राजूदास पवार, सतिश पवार, विजय पवार, बजरंग दाभेकर आणि रोशन माने यांना दिली. या सर्वांनी नदी पात्राजवळ जात या मगरीला बाहेर काढले आणि सिस्केप संस्थेला याची माहिती दिली. त्यानंतर सिस्केपचे सदस्य ओंकार माने यांनी वन विभागाला कळविले.
वन विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे, वनपान विजयकांत पवार, वनरक्षक पी.डी. जाधव, प्रकाश पवार यांच्यासह संस्थेचे सदस्य ओमकार माने, अक्षय भवरे, परेश खाडे, श्रद्धा जोशी, चिंतन वैष्णव, मित डाखवे, प्रणव कुलकर्णी, योगेश गुरव यांनी मगरीला जाळ्यातून सुखरुप बाहेर काढले. तसेच तिची पाहणी केली गेली. पाहणीअंती असे लक्षात आले की, सदर मगर एप्रिल महिन्यामध्ये वडवली गावात पकडली होती.
वन विभाग महाड व सिस्केप संस्थेच्या मदतीने मगरीला जाळ्यातून सोडवून पुन्हा तिच्या मूळ अधिवासात सोडण्यात आले.