अलिबाग । केंद्र सरकारने केलेल्या इंधन, खत दरवाढीविरोधात आज (22 मे) अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले.
यावेळी दत्ता ढवळे, तालुका उपाध्यक्ष जयेंद्र भगत, युवक तालुकाध्यक्ष मनोज शिर्के, अलिबाग तालुका चिटणीस संदीप गोठीवरेकर, सुनील गुरव, धनंज कवठेकर, शहर अध्यक्ष राजन तांडेल, नरेश थळे, महेश कवळे, कार्यालयीन चिटणीस गौरव पाटील, प्रिया ढवळे, वाडगाव सरपंच सरिता भगत, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्र सरकारकडून होत असलेली पेट्रोल-डिझेल दरवाढ, रासायनिक खतांचे वाढते भाव, गॅस सिलेंडर दरवाढ, कोरोना काळात लसींचा होत असलेला अपुरा पुरवठा व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्याला शेतकरी व बागायतदारांना 1000 कोटींची मदत आणि दुसरीकडे महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाकडून मदत नाही, याविरोधात अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध दर्शवत निदर्शने करण्यात आली.
बायपास चेंढरे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे करण्यात आलेल्या या निदर्शन आंदोलनात शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.