अलिबाग । महाड तालुक्यातील दासगाव ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये बाधित झाली होती. त्यामुळे जुन्या इमारतीच्या आलेल्या निधीमधून ग्रामपंचायतीच्याच दुसर्या जागेमध्ये नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली आहे.
या नव्या इमारतीचे उद्घाटन रविवारी (23 मे) पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते व महाड पोलादपूर चे आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलीस उपअधीक्षक निलेश तांबे, तहसिलदार दिप्ती देसाई, नायब तहसिलदार शरद कुमार आडमुठे, पोलीस उपनिरीक्षकलोणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाड तालुक्यातील दासगाव ग्रामपंचायत ही 11 सदस्यांची असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये जुनी इमारत बाधित झाली होती. त्याच्या मोबदल्यात शासनाकडून 46 लाख रुपये मंजूर झाले होते. मोबदला प्राप्त झाल्यानंतर गावाजवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्याच दुसर्या जागेत नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. नवीन इमारतीवर अंदाजे 45 लाख रुपये एवढा खर्च झाला असल्याची माहिती ग्रामसेवक अजित पोळेकर यांनी दिली आहे.