- माणगाव, म्हसळ्यातून मोबाईल लसीकरण मोहिमेला सुरुवात
- जिल्हा परिषद आरोग्य विभाग व स्वदेस फाऊंडेशनचा पुढाकार
- जिल्ह्यातील 7 तालुक्यांचा समावेश
अलिबाग । जिल्हा परिषद आरोग्य विभाग-रायगड व स्वदेस फाऊंडेशन यांच्यावतीने मोबाईल लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना गावातच कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. आज (29 मे) माणगाव तालुक्यामधील तासगाव आदिवासी वाडी व म्हसळा तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी येथे मोबाईल लसीकरण व्हॅनचे उद्घाटन करुन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडलेल्या या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, स्वदेस फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार उपस्थितीत होते.
रायगड जिल्हा परिषद व स्वदेस फाऊंडेशन यांच्यामध्ये मोबाईल लसीकरण व्हॅनच्या माधमातून रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड व सुधागड तालुक्यांमधील दुर्गम भागांमध्ये 45 वर्षांवरील आदिवासी, अपंग व वयोवृद्ध ग्रामस्थांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याविषयी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.
स्वदेस फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, उपसंचालक तुषार इनामदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी या सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत.
दुर्गम भागातील लोकांना लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जायला लागत होते. त्यासाठी त्यांचा वेळ व पैसाही खर्च होत होता. आता मोबाईल लसीकरण व्हॅनच्या माध्यमातून या दुर्गम गावातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लस त्यांच्या गावामध्येच मिळणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्वदेस फाऊंडेशनचे रॉनी स्क्रूवाला, झरीना स्क्रूवाला व मंगेश वांगे यांचे आभार मानले व टीमचे कौतुक केले. तसेच जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
दररोज तीनशे ते चारशे लोकांचे लसीकरण
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मोबाईल लसीकरण मोहिमेमध्ये सात तालुक्यांमधील दुर्गम भागात लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. स्वदेस फाऊंडेशन, आशा, अंगणवाडी ताई व सर्व आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांच्या मदतीतून आदिवासी, अपंग, वयोवृद्ध यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगत, मोबाईल लसीकरण व्हॅनच्या माध्यमातून दररोज तीनशे ते चारशे लोकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचेही डॉ.किरण पाटील यांनी सांगितले.
लसीकरणासाठी तीन मोबाईल व्हॅनचा वापर करण्यात येणार असून, जास्तीत-जास्त अतिदुर्गम भागातील लाभार्थीपर्यंत ही मोहीम घेऊन जाणार असल्याचे स्वदेस फाऊंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी तासगाव सरपंच प्रकाश जंगम, विकास समिती तासगाव आदिवासीवाडी अध्यक्ष अंकुश जाधव, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र जगताप, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.परदेसी, ग्रामसेवक बाळाराम जाधव, बाबूशेठ खानविलकर, सुभाष केकाणे, आशा वर्कर कीर्ती कडू, प्राथमिक शिक्षक अर्चना शेळके, स्वदेस फाऊंडेशन चे विनोद पाटील, अविनाश रेवणे, नयन पोटले, राहुल टेंबे, सुधीर कांबळे, अनिल सिंग उपस्थित होते.