आता सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहणार दुकाने
अलिबाग । रायगडसह राज्यभरात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुकानांच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. नियमितपणे पूर्णवेळ सुरु ठेवण्यास मान्यता दिलेली दुकाने आजपासून केवळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
ताउक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे व उद्भवलेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 19 मे रोजी आदेश जारी करत अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह अन्य काही दुकाने नियमितपणे पूर्णवेळ सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती.
यामध्ये किराणा, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, चिकन, मटण, मासळी विक्रेते, रेशन दुकानदार, फे्रब्रिकेशनची कामे करणारी अस्थापने, शेतीची अवजारे व या संबंधित दुकाने, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे, तसेच सिमेंट पत्रे, ताडपत्री, विद्युत उपकरणे तसेच हार्डवेअरची दुकाने यांचा समावेश होता.
मात्र सोमवारी (31 मे) जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, नियमितपणे पूर्णवेळ सुरु ठेवण्यास मान्यता दिलेली दुकाने, आस्थापना (शेतकामासंबंधित दुकानांसह) यापुढे केवळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
वर नमूद वेळेनुसार दुकाने, आस्थापना बंद झाल्यावर या ठिकाणी मालाची अदलाबदल, साठवणूक इ. कारणासाठी होणार्या माल वाहतुकीस कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. मात्र दिलेल्या वेळेनंतर दुकानांना सेवा देता येणार नाही.
हे आदेश 1 जून रोजी सकाळी 7 ते 15 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.