उद्यापासून कर्जत-माथेरान मिनीबस सेवा सुरु होणार

By Raigad Times    20-Jun-2021
Total Views |
Karjat-Matheran-Minibus_1
 
स्थानिकांच्या मागणीला यश
 
माथेरान । कोविड काळात लॉकडाऊन लागल्यानंतर कर्जत-माथेरान मिनीबस सेवा बंद करण्यात आली होती. तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर स्थानिकांनी केलेल्या मागणीचा विचार करत कर्जत आगाराने कर्जत-माथेरान मिनीबस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, 21 जूनपासून ही सेवा सुरु होणार आहे.
 
माथेरानमधील सर्वसामान्य जनतेकडे वाहन नसल्याने स्थानिकांना मिनीबसचा मोठा आधार होता. कोणत्याही कामासाठी व विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मिनीबस माथेरानकरांची जीवनवाहिनी बनली होती. कमी पैशांत सुरक्षित प्रवास त्यामुळे मिनीबसला माथेरानकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत होता. मात्र कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे माथेरान लॉकडाऊन झाले.पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकसुद्धा नसल्यामुळे प्रवासी संख्या घटली. त्यामुळे एसटी प्रशासनाने ही सेवा बंद केली होती.
 
माथेरानमध्ये कोविड रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मनसेचे संतोष कदम व भाजपच्या शिष्टमंडळाने व्यवस्थापकांची भेट घेऊन मिनीबस लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात निवेदने दिली. या निवेदनाचा सकारात्मक विचार करत अखेर एसटी महामंडळाच्या कर्जत आगाराने उद्या, 21 जूनपासून मिनीबस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
दिवसातून तीन फेर्‍या कर्जतहून तर तीन फेर्‍या माथेरानहून असणार आहेत. ही मिनीबस सुरु होत असल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
--------------------------------
मिनिबस सुरु करण्यासंदर्भात माथेरानकरांनी निवेदने दिली होती. त्यानुसार आम्ही सध्या तीन तीन फेर्‍यांमध्ये ही सेवा लोकांना देणार आहोत. मात्र या सेवेचा लाभ उठवताना कोविडच्या नियमांचे पालन करावे. मास्क घालणे अनिवार्य आहे. मास्कशिवाय बसमध्ये परवानगी मिळणार नाही.
- शंकर यादव, व्यवस्थापक, कर्जत एसटी आगार
--------------------------------
माथेरानमधील कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लोकांच्या मागणीनुसार मिनीबस सुरु करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्याला आगाराने सकारात्मक प्रतिसाद देत 21 जूनपासून मिनीबस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनीसुद्धा कोविडच्या नियमांचे पालन करत मास्क घालून बस चा प्रवास करावा.
- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा, माथेरान
-------------------------------- 
कर्जत-माथेरान मिनीबस वेळापत्रक
कर्जतहून - सकाळी 8.15 वाजता, दुपारी 12 वाजता, सायंकाळी 4.45 वाजता
माथेरानहून - सकाळी 9.30 वाजता, दुपारी 1 वाजता व सायंकाळी 6 वाजता