नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : ...आणि प्रशांत ठाकूर म्हणाले, विषयच संपला!
By Raigad Times 21-Jun-2021
Total Views |
मुंबई । नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले जाणार असेल तर आपला विरोध राहणार नाही, असे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्याला सांगितले असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकूरांच्या या भूमिकेमुळे बाळासाहेबांसोबत दि.बां. पाटील यांचे नावदेखील आपोआपच मागे पडण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक शेतकरी नेते दि.बां. पाटील यांचे नाव देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यातच मध्यंतरी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव राज्य सरकारने घेतला आणि वाद सुरु झाला. स्थानिक आगरी कोळी समाजासोबतच भाजपनेही दि.बां. पाटील यांचे नाव देण्याची भूमिका लावून धरली.
स्थानिक जनभावना लक्षात घेता, दि.बां. पाटील यांच्या नावाला पाठींबा मिळवण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (21 जून) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली भूमिका मांडली. मात्र राज यांनी एक वेगळेच मत मांडले आहे. मुंबईप्रमाणेच नवी मुंबईत होणारे विमानतळदेखील आंतरराष्ट्रीय असल्यामुळे तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावर, जर महाराजांचे नाव विमानतळाला दिले जाणार असेल तर आमचा विरोध राहणार नाही, असा शब्द आ. प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.