माथेरानमधील भाजपवासी झालेल्या 10 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

22 Jun 2021 14:58:14
Matheran Nagar Parishad_1
 
शिवसेनेकडून अपील दाखल; 30 जूनला होणार सुनावणी
 
कर्जत (संतोष पेरणे) । माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या 10 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता, त्या सर्व नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची टांगती तलवार आली आहे. शिवसेनेच्यावतीने पक्षाचे मुख्य सचिव खासदार अनिल देसाई यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले आहे. या अपिलावर 30 जून रोजी सुनावणी होणार असून या सुनावणीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
 
27 मे रोजी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेमधील उपनगराध्यक्ष आकाश चौधरी तसेच नगरसेवक रुपाली आखाडे, प्रियांका कदम, ज्योती सोनावले, प्रतिभा घावरे, संदीप कदम, सुषमा जाधव, राकेश चौधरी, सोनम दाभेकर आणि स्वीकृत सदस्य चंद्रकांत जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर माथेरान नगरपालिकेमधील शिवसेनेची सत्ता एकाच वेळी 10 सदस्यांनी पक्ष सोडल्याने खालसा झाली होती. मात्र पक्ष राज्यात सत्तेत असताना पक्षातील 10 सदस्यांनी एकाचवेळी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करणे हे शिवसेनेला रुचले नाही.
 
पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी या पक्षप्रवेशाची गंभीर दखल घेत अगदी त्याच दिवशी पक्ष सोडून गेलेल्या कोणत्याही नगरसेवकांना विनंती न करता थेट पक्षांतर बंदी कायद्याचे पत्र रायगड जिल्हाधिकारी यांना पाठवून दिले. पक्षाचे मुख्य सचिव खासदार अनिल देसाई यांनी भाजप प्रवेशाचा आनंद साजरा करीत असताना त्याच दिवशी 27 मे रोजी त्या 10 सदस्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे, असे पत्र पक्षाच्यावतीने दिले.
 
तर पक्षाचे माथेरान नगरपरिषदेमधील गटनेते प्रसाद सावंत यांनी 28 मे रोजी शिवसेना माथेरान शहर शाखेच्या बैठकीचे इतिवृत्त आणि पत्र रायगड जिल्हाधिकारी यांना सादर केले होते. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री तथा शिवसेना सचिव अ‍ॅड.अनिल परब यांच्याकडून माथेरान प्रश्नी माथेरान शहर शिवसेनेला कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन केले जात आहे.
 
भाजपमध्ये प्रवेश करताना किमान 10 सदस्यांनी शिवसेना सोडली पाहिजे, असे भाजपकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार 10 सदस्यांनी शिवसेना पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला, परंतु त्यात एक स्वीकृत सदस्य असल्याने शिवसेना पक्ष सोडून भाजपात प्रवेश करणार्‍या सदस्यांची संख्या 9 राहते. माथेरान नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे 14 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे 15 सदस्य निवडून आले होते.
 
त्यामुळे त्यातून फुटून नवीन गट स्थापन करण्यासाठी किंवा इतर पक्षात आघाडीमध्ये प्रवेश करण्यासाठी किमान 10 सदस्यांची गरज होती आणि भाजपात प्रवेश केलेल्या जनतेतून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ही 9 आहे. त्यामुळे त्या सर्वांवर पक्षांतर बंदी कायद्याद्वारे कारवाई करावी, अशी मागणी मुंबई सेनाभवन या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून पत्राद्वारे मागणी केली आहे.त्यामुळे भाजपात प्रवेश करणार्‍या सदस्यांबाबत पक्षांतर बंदीचे सावट आले आहे.
 
या वर्षअखेर माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश करणार्‍या 10 सदस्यांना जरी पक्षांतर बंदी कायद्यानुसार आपले पद गमवावे लागले तरी त्यांचा कार्यकाळ काही महिन्यांचा शिल्लक राहणार असल्याने त्यांनी फार काही गमवले असे होणार नाही.
--------------------------------------
27 मे रोजी आमच्या पालिकेतील 10 सदस्यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर काही तासांनी आम्हाला पक्ष नेतृत्वाने सेनाभवन येथे बोलावून घेतले. सर्व परिस्थितीची जाणीव पक्षाचे मुख्य सचिव खासदार अनिल देसाई, सचिव अनिल परब आणि नगरविकास मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी करून घेतली. त्यानंतर पक्षाने पक्षांतर बंदी कायद्यानुसार शिवसेना सोडून गेलेल्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी रायगड जिल्हाधिकारी यांना पक्षाच्यावतीने केली आहे.
- प्रसाद सावंत, शिवसेना गटनेते, माथेरान नगरपरिषद
Powered By Sangraha 9.0