अपघात! औषधांचा ट्रक उलटला; क्लीनरचा मृत्यू, चालक जखमी

By Raigad Times    22-Jun-2021
Total Views |
Accident_Mangaon_1 &
 
माणगावजवळील गारळ गाव येथील दुर्घटना
 
माणगाव । मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून पाच किमी अंतरावर असणार्‍या गारळ गावच्या हद्दीत औषधे घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकचालक जखमी झाला आहे.
 
ही दुर्घटना सोमवारी (21 जून) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई महादेव कराळे यांनी दिली आहे. चालक प्रितेश भागोजी गोलांबडे (रा. वडपाले ता.माणगाव) हा त्याच्या ताब्यातील ट्रकमध्ये औषधांचे बॉक्स घेऊन जात होता. गारळ गावच्या हद्दीत भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन उलटला.
 
या अपघातात ट्रकचा क्लीनर प्रणय अनिल करबेळे (रा. वडपाले ता.माणगाव) याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक प्रितेश गोलांबडे हा जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि घटनास्थळाची पाहणी केली.
 
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, ट्रकचालक प्रितेश गोलांबडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सायगावकर हे करीत आहेत.