बंदी असताना पोलिसांची नजर चुकवून भिजायला गेले होते शालेय मित्र
पनवेल । खारघरमधील प्रसिद्ध असणार्या पांडवकडा धबधब्यावर दुर्दैवी घटना घडली आहे. धबधब्यावर भिजण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा धबधब्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला. आज सकाळी डोहातील खडकात अडकलेला त्याचा मृतदेह फायर ब्रिगेड कर्मचार्यांनी बाहेर काढला.
मानखुर्द-गोवंडी येथील शाळेतील मित्र गौरव लोखंडे, अखीप खान, सूरज यादव, मौसम घरती, राहील खान हे पाच मित्र मंगळवारी (22 जून) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पांडवकडा धबधब्यावर आले होते. पांडवकडा धबधब्यावर जाण्यासाठी पोलिसांकडून मनाई असतानाही पोलिसांचा डोळा चुकवून हे सर्व तरुण पांडवकडा धबधब्यावर आल्यानंतर त्यापैकी गौरव लोखंडे, राहिल खान व मौसम घरती यांनी डोहामध्ये उड्या मारल्या.
त्यादरम्यान अचानक पाऊस सुरू झाल्याने धबधब्याच्या वरच्या बाजूस असणार्या कॅचमेन्ट भागात पाण्याचा प्रवाह वाढला आणि खाली पोहणारे हे युवक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागले. त्यापैकी गौरव व राहील या दोघाजणांना पोहायला येत असल्याने ते दोघेजण वर आले. परंतु मौसम घरती हा वर आला नसल्याने त्याच्या मित्रांनी नवी मुंबई कंट्रोलला कळविले.
त्यानंतर फायर ब्रिगेड व खारघर पोलिसांनी पाण्यात गळ टाकून तसेच प्रत्यक्ष स्विमर पाठवून सदर तरुणाचे शोधकार्य सुरू केले. खारघर पोलीस व अग्निशमन दल या तरुणाचा रात्रभर शोध घेत होते. परंतु सदर तरुणाचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर आज (23 जून) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मौसम घरती या तरुणाचा मृतदेह सापडला. फायर ब्रिगेड कर्मचार्यांनी पांडवकडा धबधब्याच्या डोहातील खडकाखाली अडकलेल्या मौसम घरती या 18 वर्षीय तरुणाने प्रेत बाहेर काढले.
खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातली आहे. या अनुषंगाने खारघर पोलिसांनी याठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे. परंतु तरीदेखील काही अतिउत्साही पर्यटक पोलिसांचा डोळा चुकवून डोंगरातील पायवाटेने तसेच छुप्या मार्गाने धबधब्यांवर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मनाई आदेश झुगारून पांडवकडा धबधब्यावर गेल्याचे आढळून आल्यास सदर पर्यटकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
--------------------------------
पांडवकडा धबधब्यावर जाण्यासाठी मनाई आदेश असतानाही पोलीस बंदोबस्त चुकवून छुप्या वाटेने जाणार्या पर्यटकांनावर यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच यापुढेही बंदी झुगारून जाणार्या पर्यटकांवर कारवाई सुरुच राहील. परंतु गुन्हे दाखल करणे हा पोलिसांचा यामागचा उद्देश नाही. किंबहुना सर्व नागरिकांची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सदर ठिकाणी धबधब्यांवर जाऊ नये, असे सर्व पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे.
- शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2, नवी मुंबई