माथेरान : एमजेपीकडून पाण्याच्या टाक्यांची सफाई

By Raigad Times    28-Jun-2021
Total Views |
Matheran_water supply_1&n
 
स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने माथेरानकरांमध्ये समाधान
 
माथेरान । माथेरानमध्ये स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नुकतीच पाणी साठवणूक केल्या जाणार्‍या 3 दशलक्ष लिटर क्षमतेच्या दोन टाक्यांची सफाई करण्यात आली. या टाक्यांमधूनच माथेरानकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
 
माथेरानमध्ये नागरिकांना तसेच हॉटेलमार्फत पर्यटकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकारणकडून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. दरवर्षी पाऊस सुरु झाला की माथेरानकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असे. त्यामुळे येथील नागरिकांना गढूळ पाण्याचा ताप सहन करावा लागायचा.
 
मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत गजभिये, कार्यकारी अभियंता विजय कुमार सूर्यवंशी तसेच उपअभियंता दीपक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येथे कार्यरत असलेले अभियंता किशोर देशमुख यांनी पाणी साठवणूक होणार्‍या टाक्या साफ करण्याचा निर्णय घेतला.

Matheran_water supply_2&n 
 
फिल्टर हाऊस येथील खूप वर्षांपासून सफाई न केलेल्या टाक्यांची पाहणी करण्यात आली. खूप गाळ असल्याचे निदर्शनास आल्याने या टाक्यांची साफसफाई करण्याचा निर्णय घेऊन येथील कर्मचार्‍यांच्या मदतीने या टाक्या स्वच्छ करण्यात आल्या. या टाक्या काही वर्षांपूर्वी बांधल्या गेल्यापासून याची सफाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे एमजेपीकडून या टाक्यांच्या सफाईला प्राधान्य देण्यात आले.
 
जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून या टाक्यांची व फिल्टर हाऊसची सफाई सुरु केली होती. अखेर चार दिवसांच्या सफाईनंतर या टाक्या स्वच्छ करुन त्यामधून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे माथेरानकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
-----------------------------------
पावसाळा सुरु झाला की वाहून गेलेल्या पाण्यामुळे गढूळता वाढते. त्यामुळे टाक्यांमध्ये गढूळ पाणी येते. या टाक्या साफ न केल्यामुळे वरिष्ठांनी या टाक्या साफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या टाक्या साफ केल्या असून योग्य मात्रेमध्ये आलम आणि क्लोरीनचा वापर करुन पाणी फिल्टर करुन लोकांना देत आहोत.
- किशोर देशमुख, अभियंता, एमजेपी, माथेरान कार्यालय
-----------------------------------
दरवर्षी पावसाळा सुरु झाला की गढूळ पाणी नळाला यायचे. आम्ही अक्षरशः हैराण व्हायचो; पण यावर्षी किशोर देशमुख या अनुभवी अधिकार्‍यांनी यावर लक्ष देऊन टाक्या साफ केल्या. त्यामुळे आम्हाला यावर्षी स्वच्छ पाणी मिळत आहे.
- केतन रामाणे, स्थानिक