नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांची मागणी
माथेरान/संतोष खाडे । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली कर्जत-माथेरान मिनीबस सेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केली आहे. ही सेवा बंद असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर वाहतूक सेवा पूर्णतः कोलमडून गेली आहे. कर्जत-माथेरान मिनीबस सेवाही पूर्णतः बंद करण्यात आली आहे. माथेरानमधील नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहारात या बंद केलेल्या बसेसमुळे खूपच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
खाजगी वाहनाने प्रवास करणे खूपच महाग, त्रासदायक ठरत आहे. अवाजवी दरामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत असून, मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कर्जत व इतर ठिकाणी जाणे शक्य होत नाही.
सध्या राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही ठिकाणी सुरु केल्या आहेत. त्याप्रमाणे कर्जत ते माथेरान मिनीबस सेवा लवकरात लवकर सुरु करावी, अशी मागणी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केली आहे. तसे निवेदन नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी कर्जत आगार व्यवस्थापकांना दिले आहे.