रायगड : कर्जतमध्ये वर्षासहलीसाठी आलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

By Raigad Times    10-Jul-2021
Total Views |
waterfall_Pali Bhutivali
 
पाली-भूतीवली धरण परिसरातील घटना
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणाच्या जलाशयात पाणी घेऊन येणार्‍या धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (10 जुलै) दुपारी घडली. या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे. पावसाने आज सकाळपासून उघडीप दिलेली असताना मुंबई कुर्ला येथील सहा जण या धब्याधब्यावर फिरायला आली असताना ही घटना घडली.

waterfall_Pali Bhutivali  
 
मुंबई कुर्ला येथील नानीबाई चाळ नौपाडा येथील सहा पर्यटक आज वर्षासहलीसाठी कर्जत तालुक्यात आले होते. सामान्य लोकांना रेल्वे प्रवास बंद असल्याने ते सहाजण रिक्षा घेऊन कल्याण-कर्जत रस्त्याने कर्जत तालुक्यात आले होते. ती रिक्षा यापूर्वी कर्जत तालुक्यात वर्षासहलीसाठी आल्याने डिक्सळ येथे नाष्टा करून ते सर्व पाली भूतीवली धरणावर पोहचले.

waterfall_Pali Bhutivali  
 
डिक्सळ नाक्यावरून पाली वसाहत येथे चालत जाऊन सागाचीवाडी आणि चिंचवाडी ग्रामस्थ ज्या पायवाटेने आपल्या घरी जातात. तो रस्ता पाली धरणाच्या जलाशयाला लागून डोंगराच्या कडेने जातो. तो संपूर्ण रस्ता डोंगराला लागून असल्याने लहान धबधबे तेथे निर्माण झालेले आहेत. त्यातील पायवाटेवरील एका धबधब्यावर ते सहाजण दुपारी बारा वाजण्याच्यादरम्यान पोहचले होते.

waterfall_Pali Bhutivali  
 
धबधब्यावर मौजमजा करीत असताना त्यातील काही जण धबधब्याला पाणी कमी असल्याने पाली भूतीवली धरणाच्या जलाशयात उतरले. ज्या ठिकाणी पाली गाव होते, त्या ठिकाणी खोलगट भाग असून जुन्या मोडून टाकलेल्या घरांचे अवशेषदेखील आहेत. त्यामुळे त्या पाण्याचा अंदाज कोणालाही लागत नसल्याने वर्षासहलीसाठी आलेले पर्यटक हे त्या पाण्यात बुडाले. एकूण चार पर्यटक त्या ठिकाणी धरणाच्या पाण्यात उतरले होते, मात्र त्यातील एक पाण्याच्या बाहेर येण्यात यशस्वी ठरला असून अन्य तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

बुडालेले पर्यटक हे अल्पवयीन असून ते एवढ्या लांब कसे पोहचले? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. साहिल हिरालाल त्रिभुके (वय 15), प्रितम गौतम साहू (वय 12), मोहन साहू (वय 16) असे तिघेजण बुडाले असल्याची माहिती स्थानिक आदिवासी लोकांनी कळविल्यावर नेरळ पोलीस घटनास्थळी पोहचले. स्थानिक आदिवासी लोकांच्या मदतीने बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

waterfall_Pali Bhutivali  
 
नेरळ पोलिसांनी खोपोली येथील अपघातग्रस्त पथक खोपोली यांचे पथक पोलिसांच्या मदतीला पोहचले होते. त्यांनी सायंकाळी साडेसहा वाजता पाण्यात उतरुन शोध कार्य करण्यास सुरुवात केली. सात वाजता पहिला मृतदेह तर पुढील अर्ध्या तासात सर्व मृतदेह सापडले. अपघातग्रस्तांच्या ग्रुपने त्या मृत्यूमुखी पडलेल्या मुलांसोबत असलेल्या मित्रांच्या माहितीनुसार शोध कार्य केले.
 
घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे उपअधीक्षक अनिल घेरडीकर, नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय बांगर, उपनिरीक्षक मुळीक यांच्यासह पोलीस आणि स्थानिक आदिवासी आणि डिक्सळ परिसरातील कार्यकर्ते मदतीसाठी घटनास्थळी होते. या अपघाताच्या निमित्ताने यावर्षीच्या पावसाळ्यात घडलेली दुसरी घटना असून आतापर्यंत चार पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी उल्हास नदीमध्ये एक तरुण बुडाला होता.