सुधागड : पाली गावची शुद्ध नळपाणी पुरवठा योजना अडकली लालफितीत

17 Jul 2021 17:33:46
Pali_Sudhagad-Water Schem
 
  • पालीकरांना प्यावे लागतेय दूषित पाणी, जनतेचे आरोग्य धोक्यात
  • पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
पाली/बेणसे । सुधागड ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न निकाली निघाला आहे, मात्र सुमारे 12 कोटींची पाली गावाची शुद्ध नळपाणी पुरवठा योजना वर्षांनुवर्षे लालफितीत अडकून पडली आहे. त्यामुळे पालीकरांना दूषित पाणी प्यावे लागत असून, येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालीकरांना शुद्ध व मुबलक पाणी कधी मिळणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
 
पाली शहराला अंबा नदीचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पुरविले जाते. तब्बल 15 हजारांहून अधिक लोक या पाण्यावर अवलंबून आहेत. पालीकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे, ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न जसा सोडविला तसाच पाणी प्रश्नदेखील सोडवावा, अशी मागणी पालकमंत्री आदिती तटकरेंनी यांच्याकडे केली जात आहे.
 
अंबा नदीचे पाणी सांडपाणी, शेवाळ व रसायनांमुळे प्रदूषित झाले आहे. शोकांतिका म्हणजे पाली शुद्ध नळपाणी पुरवठा योजना मागील 15 ते 20 वर्षांपासून प्रलंबित आहे. सद्यस्थितीत तब्बल 12 कोटींची शुद्ध नळपाणी योजना लालफितीत अडकली आहे. त्यामुळे ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 
अंबा नदीच्या पाण्यात पावसाळ्यात गाळ व चिखलाचे प्रमाण अधिक असते. तर नंतर मोठ्या प्रमाणात हिरवळ व शेवाळ असते. साप, मासे, शिंपले नळाद्वारे थेट येतात. तसेच नाले व गटारांमधील प्रदूषित सांडपाणी, रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी हे अंबा नदीत सोडले जाते. याबरोबरच कचरा आणि घाणही साठते.
 
नदीवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच नदीत निर्माल्यही टाकले जाते. यामुळे अंबा नदीचे पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित व खराब होते. या सर्वांमुळे पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. असे पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी बहुसंख्य नागरिक अधिकचे पैसे खर्च करुन पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा आधार घेत आहेत.

Pali_Sudhagad-Water Schem
 
शुद्ध पाणी योजनेची प्रतिक्षा
 
शासनाने केलेल्या 2008-09 च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79 लाखांचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतू राजकीय श्रेयवादामध्ये ही योजना रखडली. त्यावबरोबर 10 टक्के लोकवर्गणीचा प्रश्नही होता.
 
अशातच पालीला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे; पण अजूनही ही योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही. सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे पुढारी या योजनेचे निवडणुकीपुरते भांडवल करताना दिसतात.
 
पाणीटंचाईचे सावट
 
अंबा नदीजवळील जॅकवेलमध्ये असलेल्या पंपांद्वारे पाणी सरगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते व तेथून सर्व पालीत पाणीपुरवठा केला जातो. तर काही भागात नदीतून थेट पाणीपुरवठा केला जातो. मात्र जॅकवेल ते साठवण टक्या यांच्या दरम्यानचे मोठे अंतर, वाहिन्यांचा छोटा आकार, वारंवार फुटणार्‍या लहान, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या, साठवण टाक्यांची दुरवस्था, सतत बिघडणारे व अपुर्‍या क्षमतेचे पंप, जॅकवेलमध्ये गाळ साठणे, जुने वॉल फुटणे, मुख्य जल वाहिनीला जोडलेल्या इतर वाहिन्या, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व अपुरे कर्मचारी अशा असंख्य कारणांमुळे पालीत नेहमी पाणीटंचाई भेडसावते. नळपाणी योजना झाल्यास ही समस्या निकाली निघू शकते.
 
आमदार रविंद्र पाटील हेदेखील पालीतील पाणी प्रश्नावर संबंधित अधिकारी वर्गाची बैठक घेऊन पालीकर जनतेला शुद्ध पाणी जलद गतीने कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान ही योजना जुनी आहे. नगर पंचायत प्रशासक म्हणून ही योजना अंमलात आणण्यासाठी स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. याकामी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करु असे, असे पाली नगरपंचायतीचे प्रशासक दिलीप रायण्णावार यांनी सांगितले.
----------------------------------
अंबा नदी सुधागडवासियांची जीवनदायिनी आहे. अंबा नदीचे पाणी खराब असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रलंबित नळपाणी योजना लवकर कार्यान्वित करावी.
- नोएल चिंचोलकर, ग्रामस्थ, पाली
Powered By Sangraha 9.0