- कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नद्या वाहताहेत इशारा पातळीवरुन
- गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 186.51 मिमी पाऊस
अलिबाग : रायगडला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या 24 तासांत 186.51 मिमी च्या सरासरीने जिल्ह्यात एकूण 2984.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. काल मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे दरड कोसळून 3 ते 4 घरांचे नुकसान झाले होते, तर आज (19 जुलै) दिघी ते माणगांव रस्त्यावर कुडगाव येथे दरड कोसळली आहे. त्यामुळे सदर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
याठिकाणी दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. आजही पावसाचा जोर कायम असून रायगड पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या सकाळी 10 वाजताच्या अहवालानुसार रोह्यातील कुंडलिका आणि अंबा तर खालापूर तालुक्यातील पाताळगंगा ही नदी इशारा पातळीच्या वरुन वाहत आहेत. तर महाडची सावित्री, कर्जतची उल्हास आणि पनवेलची गाढी ह्या नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे.
-----------------------
भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यात आज, 19 जुलै 2021 रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे.
सखल भागातील नागरिकांनी विशेषतः नदी/खाडी/ समुद्र किनाऱ्यावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. दरड प्रवण गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. पावसाचे प्रमाण विचारात घेऊन अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच प्रवास करावा. आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष
जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग
02141- 222097 / 227452; 8275152363