महाडसह रायगडकरांना मोठा धक्का
अलिबाग : महाडकरांसह रायगडकरांसाठी आजची सकाळ अत्यंत वाईट बातमी घेऊन आली. महाडचे माजी आमदार, तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिक जगताप (आबा) यांचे आज मुंबई येथे निधन झाले. ते 54 वर्षांचे होते.
माणिक जगताप यांच्या निधनाच्या वृत्ताने रायगडकरांना मोठा धक्का बसला आहे. एक उमदे , हरहुन्नरी , कर्तृत्ववान नेतृत्व हरपले. माणिक जगताप यांच्याकडे विकासाचे व्हिजन होते. त्यांच्याशी प्रत्येकवेळी बोलताना हे जाणवत असे. रायगड जिल्ह्यात काँग्रेसच्या पडत्या काळात पक्ष जिवंत ठेवून उभा करण्याचे काम त्यांनी केले.
त्यांची राजकीय कारकीर्द विद्यार्थी काँग्रेसमधून झाली. सतत कामात व्यस्त असणारा नेता. महाड पोलादपूर करांसाठी काहीतरी करण्याचा त्यांचा ध्यास प्रत्येक भेटीत जाणवत होता. त्यांच्या रूपाने सतत हसतमुख असणारे एक उमदे नेतृत्व हरपले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
महाड येथे आज दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी कॅप्टन जगताप बंगला, नवेनगर, महाड येथे ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, महापूर आणि दरड दुर्घटना यामुळे पुरते खचलेल्या महाड, पोलापूरातील जनतेवर माणिक जगताप यांच्या जाण्याने आणखी एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एकाच महिन्यात काँग्रेसचे दोन नेते गमावले...
एकाच महिन्यात काँग्रेसचे दोन नेते रायगडकरांनी गमावले. १५ जुलैला अलिबागचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते मधुकर ठाकूर यांचे निधन झाले. तर आज माणिक जगताप यांचे निधन झाल्याने, रायगड काँग्रेसची मोठी हानी झाली आहे.