सुधागड : सरसगड किल्ल्यावरुन पाय घसरुन तरुण पडला दरीत

By Raigad Times    04-Jul-2021
Total Views |
Sarasgad Fort_Sudhagad_1& 
 
स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून काढले बाहेर; उपचार सुरु
 
सुधागड-पाली (गौसखान पठाण) । पालीतील सरसगड किल्ल्यावर गेलेला तरुण पायर्‍या उतरताना पाय घसरुन दरीत पडल्याची घटना शनिवारी (3 जुलै) सायंकाळी घडली. या घटनेत जबर जखमी झालेल्या या तरुणाला पालीतील देऊळवाडा व आगरआळी येथील तरुणांनी अथक परिश्रमाने जीवाची बाजी लावून बाहेर काढले.
 
रात्री आठच्या सुमारास त्याला पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. निलेश सावंत असे या तरुणाचे नाव असून तो पालीचा राहणारा आहे. तो आपल्या 2 मित्रांसह किल्ल्यावर गेला होता. दरम्यान पायर्‍या उरत असतांना पाय घसरुन शेजारच्या दरीत कोसळला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला व इतर ठिकाणी जबर मार लागून बेशुद्ध झाला होता.
 
त्याच्यासोबत असलेल्या सहकार्‍यांना त्याला वर काढणे शक्य नव्हते. मग येथील स्थानिक तरुणांना ही बातमी कळताच 15 ते 20 तरुण किल्ल्यावर गेले. ताबडतोब प्रदीप गोळे व प्रणव रटाटे हे तरुण जोखीम घेऊन दरीत उतरले. दोरी बांधून निलेश सावंत याला वर काढण्यात आले.

Sarasgad Fort_Sudhagad_1& 
 
त्यानंतर झोळीत टाकून मिलिंद गोळे, शुभम वरंडे, आर्यन जाधव, सुरज वरंडे, वरून रटाटे, ऋषिकेश वरंडे, केदार वरंडे, अथर्व कडू, ओंकार फाटक, किरण मढवी, केदार मढवी, विघ्नेश मढवी, प्रेषित ठोंबरे, शुभम घाडगे, स्वरूप मढवी, ऋषिकेश ठोंबरे, अमित ठोंबरे, गजानन काटकर, शुभम फोंडे आदी तरुणांनी निलेशला खाली आणले.
 
तेथून पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र गंभीर दुखापत असल्याने निलेशला पुढील उपचारासाठी पनवेल येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे.