![Vishnu Patil_1 Vishnu Patil_1](https://www.raigadtimes.co.in/Encyc/2021/8/24/2_06_37_10_Vishnu-Patil_1_H@@IGHT_319_W@@IDTH_273.jpg)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका शिवसैनिक खपवून घेणार नाहीत...
पाली/बेणसे । राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संविधानिक पदावर असून त्यांचा यथोचित सन्मान होणे गरजेचे आहे. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून सातत्याने आक्षेपार्ह विधाने होत आहेत. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका शिवसैनिक यापुढे खपवून घेणार नाहीत, असा इशारा शिवसेना माजी रायगड जिल्हाप्रमुख तथा आंदोलनसम्राट विष्णू पाटील यांनी दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री व राज्य सरकार यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांबाबत केलेले आक्षेपार्ह विधान शिवसैनिकांच्या जिव्हारी लागले असून राज्यभरात नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर अटकेची कारवाईही करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शांत, संयमी व कर्तृत्वान नेते आहेत. कोरोनासारख्या जैविक महामारीत व नैसर्गिक आपत्तीत जनतेला सावरण्यासाठी हिंमत देण्यासाठी, जगविण्यासाठी त्यांनी केलेले काम आदर्श व प्रेरणादायी ठरले आहे. टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. याचा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अभिमान आहे. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर द्वेषापोटी अवास्तव टीका करीत आहेत. नारायण राणे यांनी पुन्हा असे बेताल वक्तव्य केल्यास शिवसैनिक खपवून घेणार नाहीत, असा इशारा विष्णू पाटील यांनी दिला आहे.
नरेंद्र मोदी हे शिस्तप्रिय प्रधानमंत्री आहेत. बाळासाहेबांना ते गुरुस्थानी व आदरस्थानी मानत असत. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी योग्य ती भूमिका घेणे अपेक्षित असल्याचे पाटील म्हणाले. एका बाजूला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या स्मृतींचे दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रा सुरु करायची. तर दुसर्या बाजूला त्यांच्या मुलावर सातत्याने टीका करायची, ही नारायण राणे यांची दुटप्पी भूमिका शिवसैनिक जाणून आहेत. आज केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले नारायण राणे हे बाळासाहेबांच्या कृपाशीर्वादाने नावारुपाला आले, हे जगजाहीर आहे.
वर्षे नगरसेवकपदी असलेल्या नारायण राणे यांना बाळासाहेबांच्या कृपेने कणकवलीमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांना मंत्री करण्यात आले. तसेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांना विराजमान केले. ज्यांना शून्यातून उभे केले अशा ठाकरे कुटुंबियांसमोर नतमस्तक होण्याऐवजी सातत्याने कृतघ्न होण्याचे काम राणे पिता-पुत्रांनी केले असल्याचे विष्णू पाटील म्हणाले.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना मंत्रीपदावरुन निलंबित करावे, अशी मागणीही माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील यांनी केली आहे.