अलिबाग । रायगड पोलीस दल राज्यातील बेस्ट पोलीस युनिट ठरले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून रायगड जिल्हा पोलीस दलाची ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’साठी निवड करण्यात आली आहे. या विशेष कामगिरीबद्दल रायगड पोलिसांचे कौतुक होत आहे.
राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहीत करणे यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून रायगड जिल्हा पोलीस दलाची ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’साठी निवड करण्यात आली आहे.
कामाच्या मूल्यांकनाचे निकष सकारात्मक, नकारात्मक मापदंड इत्यादीच्या अनुषंगाने जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत दाखल गुन्ह्यांची माहिती विचारात घेऊन वार्षिक गुन्हेगारीच्या आधारावर तंतोतंत श्रेणी तयार न करता कॅटेगरी ए-वार्षिक आयपीसी गुन्हे 6 हजार पेक्षा कमी असलेले जिल्हे / आयुक्तालये, कॅटेगरी बी- वार्षिक आयपीसी गुन्हे 6 हजार पेक्षा जास्त असलेले जिल्हे/ आयुक्तालये आणि कॅटेगरी सी - पोलीस आयुक्तालय बृहन्मुंबई यांच्या अधिपत्याखालील सर्व घटक अशा तीन श्रेणीमध्ये घटकांची विभागणी करण्यात आली होती.
यापैकी ‘कॅटेगरी ए’मधून रायगड पोलीस दलाची बेस्ट पोलीस युनिट अवॉर्डसाठी निवड करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेन्द्र सिंह यांच्या स्वाक्षरीने आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. या निवडीबद्दल पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ व संपूर्ण रायगड पोलीस दलाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.