रायगडमधील नगरपंचायत निवडणुकीचा असा आहे निकाल...पहा कोणत्या पक्षाकडे गेली आपली नगरपंचायत?

20 Jan 2022 10:03:20
Mhasla Nagar Panchayat Election

राष्ट्रवादी प्रथम शिवसेना दुसर्‍या स्थानी
 ...राष्ट्रवादीला ‘या’ नगरपंचायतमध्ये भोपळादेखील फोडता आला नाही!
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन तर शिवसेनेने दोन नगरपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. एका ठिकाणी त्रिशंकू आहे तर अन्य तीन ठिकाणी वेगवेगळ्या आघाड्यांनी सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातून एक-एक नगरपंचायत गेली आहे. भाजपाने सहा जागा जिंकत चंचूप्रवेश केला. तर काँग्रेसला फारसा प्रभाव पाडता आला नाही. एका नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीला भोपळादेखील फोडता आला नाही.
 
mangav 3
 
जिल्ह्यातील खालापूर, पाली, माणगाव, तळा, म्हसळा आणि पोलादपूर नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया पार पडली. बुधवारी (19 जानेवारी) तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. सकाळी दहा वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आणि निकाल पुढे येऊ लागले. 102 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 38, शिवसेनेने 35, शेकापने 12, काँग्रेसने 8, भाजपाने 6 तर इतर 3 उमेदवार विजयी झाल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले.
नगरपंचायतनुसार सांगायचे झाल्यास, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील तळा आणि म्हसळा या दोन नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखत सत्ता मिळवली. तळा नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेकडून हिसकावून घेतली. तर म्हसळा कायम राखली आहे.
 
 tala
 
माणगाव नगरपंचायतीत मात्र राष्ट्रवादीला सत्ता राखता आली नाही. येथे शिवसेना प्रणित माणगाव विकास आघाडीने राष्ट्रवादीला धक्का दिला. माणगावचे लोकनेते स्व.अशोकदादा साबळे यांचे पुत्र अ‍ॅड. राजीव साबळे व अन्य पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर जनतेने विश्वास दाखवला. खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आ.अनिकेत तटकरे या तिघांनी आपले लक्ष माणगावकडे केंद्रीत करुनही त्यांना यश मिळवता आले नाही.
 
पोलादपूर नगरपंचायत राखण्यात शिवसेनेला यश आले. येथे मतविभाजनाचा फटका सगळ्याच पक्षांना बसल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. विशेष म्हणजे या नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला खातेदेखील उघडता आले नाही. भाजपने येथे एक जागा मिळवली आहे. पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या पाली नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीने सत्ता मिळवली आहे.
 
mangav 1
 
खालापूरमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. येथे शिवसेनेनंतर शेकापदेखील सत्तेच्या जवळ आहे. मात्र राष्ट्रवादीच्या हातात येथे सत्तेच्या चाव्या आहेत. राष्ट्रवादी ज्या पक्षाला मदत करेल तो सत्तेत बसणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि शेकापला राष्ट्रवादीच्या दोन मतांसाठी गळ घालावी लागणार आहे. शेकापची एकहाती सत्ता असलेल्या या नगरपंचायतीत शिवसेनेचे आठ तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत.
 
pali
 
भाजपाने या निवडणुकीत चंचू प्रवेश केला आहे. पक्षाचे तळा येथे 3, पाली येथे 2 तर पोलादपूर येथे 1 नगरसेवक निवडून आला आहे. तळा नगरपंचायतीत शिवसेनेच्या पराभवाला भाजप कारणीभूत ठरला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पोलादपूर वगळता या निवडणूकीत काँग्रेसला मतदारांवर फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.
-------------------------------------------------------------
रायगडातील सहा नगरपंचायतींचे निकाल खालीलप्रमाणे 
 
पोलादपूर :  शिवसेना 10, काँग्रेस 6, भाजप 1    ( शिवसेना विजयी)
तळा :         राष्ट्रवादी काँग्रेस 10, शिवसेना 4, भाजप 3 ( राष्ट्रवादी विजयी)
माणगाव :   शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस 7, शेकाप 1, काँग्रेस 1, अपक्ष 1  ( स्थानिक आघाडी-विजयी)
म्हसळा :    राष्ट्रवादी काँग्रेस 13, शिवसेना 2, काँग्रेस 2    ( राष्ट्रवादी विजयी)
खालापूर :  शिवसेना 8, शेकाप 7, राष्ट्रवादी काँग्रेस 2    ( त्रिशंकू)
पाली   :    राष्ट्रवादी काँग्रेस 6, शेकाप 4, शिवसेना 4, भाजप 2, अपक्ष 1 (राष्ट्रवादी -शेकाप आघाडी, विजयी)
पक्षानुसार विजयी उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस 38, शिवसेना 35, शेकाप 12, काँग्रेस 9, इतर 3, भाजप 6
Powered By Sangraha 9.0