पालीत संकष्टी चतुर्थीला भाविकांचा भक्तिमळा फुलला

भाविकांना सेवासुविधा पुरविण्यासाठी ट्रस्टचे सुनियोजन

By Raigad Times    21-Jan-2022
Total Views |

pali ganpati
 
 
पाली | आय.एस.ओ मानांकन प्राप्त व अष्टविनायकांपैकि प्रख्यात धार्मीक स्थळ असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी  संकष्टी चतुर्थीला पालीत भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. कोव्हीडच्या तिसऱ्या लाटेत देखील कोरोना नियमांचे पालन करीत भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शन घेताना दिसून आले, बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी
राज्य व देशातून भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थीत राहतात.
 

pali ganpati 1 
 
अशातच दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या उत्तम सोईसुविधेसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट व प्रशासन नेहमीच दक्ष व सज्ज असते. मंदिरे दर्शनासाठी खुली असल्याने भक्तांना बल्लाळेश्वराच्या दर्शनाची आगळीवेगळी ओढ दिसून येते. मागील दोन महिन्यांपासून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. संकष्टी, अंगारकी चतुर्थी दिनी पालीत भाविक भक्तगणांची मांदीयाळी असते. तर माघी मासोत्सवाला संपुर्ण पाली गाव भाविक भक्तगणांनी फुलून जाते. अंगारकी संकष्टी निमित्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गर्दीचा उच्चांक गाठला. अशावेळी भाविक भक्तगणांची कोणतीही गैरसोय होवू नये, त्यांना शिस्तबध्द पध्दतीने रांगेत दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेत उपाययोजना करण्यात आली होती. सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.
 

pali ganpati 2 
 
दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुबंई, ठाणे पुणे आदी शहरांतील भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. गर्दी असल्याने येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा देखिल तेजीत होता. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला. भाविकांसह व्यवसायिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हाॅटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॅाटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार , फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले जय्यत तयारीत होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच ऍडः धनजंय धारप, जितेंद्र गद्रे, माधव साने, विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहुल मराठे आदिंसह अन्य पदाधिकार्‍यांनी पाली बल्लाळेश्वर देवस्थानात येणार्‍या भाविक भक्तगणांना आतंरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा मिळाव्यात यादृष्टीने सुनियोजन केले आहे. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.
वाहतूक कोंडी
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे वाहतुक कोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवळाच्या शेजारून जाणारी सर्व वाहने भक्तनिवास क्रमांक 1 च्या बाजूने वळविण्यात आली होती.
दीड दोन वर्षानंतर मंदिर सुरू झाल्याने बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. खूप दिवसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक पहायला मिळाले.पर्यटक देखील मोठ्या प्रमाणावर येत आहेत.  त्यामुळे व्यवसाय देखील चांगला झाला. लहान मोठ्या व्यवसायिकांना रोजगार निर्माण झाला.
चंद्रसेन भालेराव , व्यवसाईक, बल्लाळेश्वर मंदिर परिसर
कोव्हीडनंतर बल्लाळेश्वर मंदिर व परिसर भाविकांनी फुलून निघाला आहे.बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोनाकाळात विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
ऍड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली