मुंबई : एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून ढाल-तलवार हे चिन्ह मिळालं आहे. आज याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता भविष्यात ठाकरे आणि शिंदे गटाची लढाई ही मशाल विरुद्ध ढाल तलवार अशी रंगणार आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं होतं. मात्र आता आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे गटाची तीनही चिन्हं नाकारल्यावर आता शिंदे गटाला नव्या चिन्ह्यांची यादी सकाळी 10 वाजता पाठवायची होती. त्यानुसार शिंदे गटाने ई-मेल करत तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड ही चिन्हं निवडणूक आयोगाला सादर केली होती. निवडणूक आयोगाने यापैकी ढाल तलवार हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे.
शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला खालील तीन चिन्ह पाठवण्यात आली होती. त्यापैकी त्यांना ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना असं नवीन नाव आधीच दिलं गेलं होतं. त्यानंतर आज पक्षाच्या नव्या चिन्हाची घोषणा केली गेली.
एकनाथ शिंदे गटाने जर अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवली तर त्यांना ढाल-तलवार या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. या पोटनिवडणुकीत ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी थेट निवडणूक होणार आहे. एकनाथ शिंदे गट या ठिकाणी उमेदवार देणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.