माणगाव : माणगाव-पुणे रस्त्यावर मोर्बा घाटात सुर्ले गावच्या हद्दीत एसटी बस व मोटार सायकल(दुचाकी) यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.सदरचा अपघात बुधवार दि.२३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडला.या घटनेची फिर्याद बसचालक सुभाष रामराव वाघमारे(वय-४२) रा.बागन टाकली जि.नांदेड सध्या रा.श्रीवर्धन बस डेपो यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी सुभाष वाघमारे हे त्यांच्या ताब्यातील एसटी.बस क्रमांक एम.एच.२० बी.एल.२९१५ हि गाडी श्रीवर्धन ते मुंबई अशी स्वतः चालवीत घेऊन जात असताना अपघात ठिकाणी आल्यावर माणगाव बाजूकडून येणारी मोटारसायकल क्रमांक एम.एच.१२ ए.वाय.५७० या गाडीवर बसून यांतील आरोपी रुपेश विठोबा म्हस्के(वय-३४) रा.मुगवली ता.माणगाव व मयत इसम मारुती धोंडू हिलम(वय-३७) रा.खरवली आदिवासीवाडी ता.माणगाव हे साई येथे जात असताना समोरून एसटी बस आली असता आरोपी याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल हि निष्काळजीपणे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून मोटारसायकल हि रोडवर खाली पडल्याने यांतील मोटारसायकलचे पाठीमागे बसलेले मयत इसम यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.३४०/२०२२ भादवि संहिता कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दाखल करण्यात येऊन आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी. भोजकर हे करीत आहेत.