रोहा | रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात महसूल विभागाच्या आशीर्वादाने सर्वत्र बेसुमार माती उत्खनन राजरोसपणे सुरु आहे. याकडे तलाठ्यांसह सर्वच वरिष्ठांचे माती माफियांबरोबर असलेल्या आर्थिक हितसंबधा मुळे दुर्लक्षच होताना दिसत आहे. असेच एक माती उत्खनन किल्ला येथे वनेत्तर कामास बंदी असलेल्या ग.न १११ मध्ये सुरु होते. याची माहिती रोहा वनपरिक्षेत्र कार्यालयास लागताच तात्काळ उप वन संरक्षक आप्पासाहेब निकत व सहाय्यक वन संरक्षक विश्वजीत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली रविवार ११ डिसेंबर रोजी कारवाई करण्यात आली.
रोहा वन परिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे यांचे नेतृत्वाखाली रोहा, गोफण वनपाल यांसह रोहा, ताम्हणशेत, धामणसई, पहुर वनरक्षकांनी ही कारवाई केली. यामध्ये केंद्र शासनाचे पुर्वपरवानगी शिवाय वनेत्तर कामे करण्यास बंदी असलेल्या याठिकाणी होत असणारे बेकायदेशीर माती उत्खनन करणारे जेसीबी मशीन व वाहतूकीसाठी लागणारे ढंपर पकडण्यात आले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती रोहा वन परिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे यांनी दिली आहे.