कर्जत रेल्वे स्थानकातील मुख्य पादचारी पूल वाहतुकीस बंद ; प्रवासी व नागरिकांचे हाल

By Raigad Times    22-Dec-2022
Total Views |
Karjat  
कर्जत | कर्जत हे मुंबई - पुणे दरम्यानचे मुख्य रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकावर प्रवाशांची खूप गर्दी असते. या स्थानकातील पुणे बाजूकडील मुख्य पूल तांत्रिक कामा निमित्त तब्बल महिनाभर बंद करण्यात आला असून दोन, तीन व ईएमयू फलाटावर जाणार्‍या - येणार्‍या प्रवाशां बरोबरच भिसेगाव, गुंडगे परिसरातील नागरिकांची खूप गैरसोय होत असून शॉर्टकट म्हणून रूळ ओलांडताना अपघात होण्याची शक्यता आहे.
 
कर्जत रेल्वे स्थानकातून दररोज हजारो विद्यार्थी, चाकरमानी, व्यावसायिक प्रवास करीत असतात. या स्थानकात असलेला पुणे बाजू कडील पुलाचे तांत्रिक काम निघाल्याने हा पूल पूर्णपणे बंद केला आहे. हा पूल बंद केल्याने दररोज घाईघाईने गाडी पकडण्यासाठी जाणार्‍या प्रवाशांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. तसेच पलीकडच्या बाजूला भिसेगाव, गुंडगे ही नगरपरिषद हद्दीतील गावे आहेत.

Karjat 1
सुमारे महिनाभर हा पूल बंद असणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्गाने मुंबई बाजूकडील पुलाचा वापर करायचा ठरवल्यास फलाटावरून जाताना विना तिकीट म्हणून पकडले जाण्याची शक्यता आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या एक नंबर फलाटावर येतात मात्र कधी कधी त्या दोन किंवा तीन नंबर फलाटावर आणाव्या लागतात. त्यावेळी प्रवाशांचे होणारे हाल बघवत नाहीत. तर लांबपल्ल्याच्या पुण्याकडून येणार्‍या गाड्या दोन किंवा तीन नंबर फलाटावर येतात, त्यांची खूप गैरसोय होते.
 
त्यातच कर्जतहून खोपोली कडे जाणार्‍या आणि खोपोलीहून कर्जतला येणार्‍या गाड्या दोन, तीन नंबरच्या फलाटावर येतात. तर मुंबईहून कर्जतला येणार्‍या बहुतांश लोकल ईएमयू फलाटावर किंवा दोन किंवा तीन नंबरच्या फलाटावर येतात. त्याप्रवाशांचे कुटुंब कबिल्यासह येता - जाता खूपच हाल होतात. हा पूल एक महिन्यासाठी बंद केला आहे. मात्र एक महिन्यात तरी काम होईल ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा पूल नव्याने बांधला आहे मग हा पूल बंद का करण्यात आला आहे? पनवेल साठी वेगळी लाईन टाकण्यासाठी हा पूल बंद करण्यात आला आहे काय? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत