पालीतील सरसगड किल्ल्यावर लागला वणवा, वनसंपदा जळून खाक, प्राण्यांचा अधिवास नष्ट

By Raigad Times    16-Feb-2022
Total Views |
pali sarsgad aag
 
पाली/बेणसे | पालीतील सरसगड किल्ल्यावर सोमवारी (दि.14) प्रचंड मोठा मानवनिर्मित वणवा लागला होता. या वणव्यामुळे किल्ल्याचा बहुतांश भाग जळून होरपळला. यामध्ये किल्ल्यावर नव्याने लावलेले रोपे व संवर्धन केलेली झाडे जळून खाक झाली. शिवाय येथील माकडे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच त्यांचा अधिवास देखील नष्ट झाला.

pali sarsgad aag
 
गुरुवारी (ता.10) देखील सरसगडाला वणवा लागला होता. हा वणवा 24 तासांहून अधिक काळ सुरू होता. स्थानिक नागरिक व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वणवा विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यामुळे किमान वणवा मानवी वस्तीत आला नाही. जे कोणी लोक वणवा लावत आहेत त्यांना शोधून कडक शासन करण्याची गरज आहे. शिवऋण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केतन म्हसके यांनी सांगितले.
 
कृत्रीम वणव्यांमुळे संपुर्ण सजिवसृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाचा-हास होतोे. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विविध उपाय व जनजागृती केली जाते. तसेच काही वेळेला विद्यार्थी पथनाट्य सादर करतात. मात्र हे प्रयत्न अपुरे आहेत. या उपयांबरोबरच स्थानिक लोकांना व अदिवासींना वणव्याचे दुष्परीणाम सांगून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने वनविभाग, निसर्गप्रेमी व अदिवासी विदयार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्याची गरज आहे.
 
तसेच दृकश्राव्य माध्यमांद्वारे वनव्यांमुळे होणारी हानी सर्वांसमोर आणली गेली पाहिजे. लोकांनी देखील स्वयंस्फूर्तीने वणवे रोखणे व स्वतः लावणार नाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.