मुंबई/ठाणे | कोरोना महामारीचा वेग मंदावला असून आता दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु झाले असून हॉटेल व पर्यटन व्यवसाय धुमधड्याक्यात सुरु झाले आहेत. सध्या चायनीज पदार्थांची सर्वांनाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज पदार्थ बेत आखतात. पण या पदार्थांचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक असल्याची माहिती नियमितपणे वैद्यकीय क्षेत्रातून दिली जात आहे.
अलीकडे चायनीज सेंटर व हातगाड्यांवर नाष्ट्यासाठी तरुणाईची झुंबड दिसते. मात्र, चटपटीत खाद्यपदार्थांनी सुखावणाऱ्या या खवय्यांची काही वेळाने शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडत असल्याचे समोर येत आहे. डाॅक्टरांच्या निरीक्षणानुसार तरुणाईमध्ये डोकेदुखी, अर्धशिशी, छातीत धडधड, उलट्या आणि धाप लागणे, अशा आजारांचे प्रमाण वाढत आहे, यात फास्टफुड खाणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
याविषयी अधिक माहिती देताना बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट ( पोटविकारतज्ञ) डॉ. दर्शील शहा म्हणाले, " चायनीज सारख्या खाद्यपदार्थांचे सेवन सहसा हॉटेल किंवा हातगाड्यांवर केले जाते. मन्च्युरियन, नुडल्स किंवा अन्य पदार्थांमध्ये चव येण्यासाठी अजिनोमोटोचा आणि आकर्षक दिसण्यासाठी खाद्यरंगांचा वापर केला जातो परंतु चवीसाठी वापरलेली ही क्लृप्ती शरीरावर दुरगामी परिणाम करते. अजिनोमोटो पांढऱ्या रंगाचे असून जाडसर मिठाप्रमाणे दिसते. याच्या वापरामुळे अन्नाला एक वेगळी चव येते.
अजिनोमोटोच्या अतिवापराने मायग्रेन, चक्कर येणे, हार्मोन्सचे असंतुलन, जीव घाबरा होणे, अशक्तपणा, छातीमध्ये दुखणे अश्या तक्रारी उद्भवू लागतात, अनेकांना पोटात जळजळण्याचा त्रास सुरु होतो. अजिनोमोटोच्या सततच्या सेवनाने एक प्रकारचे नैराश्य, थकवा जाणवणे असे प्रकार वाढत जाऊन पोटाचे अनेक विकार होऊ शकतात. अजिनोमोटो पावडर बद्दल ग्राहकांमध्ये कमालीची अनभिज्ञता आहे तसेच याच्या वापरावर नियंत्रण नसले तरी त्याचा वापर किती प्रमाणात व्हावा, हे स्पष्ट करणारी यंत्रणाही नसल्याने भारतीय गृहिणींकडून किचनमध्ये याचा सर्रास वापर होत आहे.
हृदयविकार व चायनीज पदार्थांविषयी सांगताना कामोठे येथील क्रिटीकेअर लाइफलाईन हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ डॉ. अविनाश गुठे म्हणाले, कोणत्याही पदार्थाचा अतिवापर हा आरोग्यासाठी घातकच असतो. अजिनोमोटोच्या अति वापरामुळे आपल्या जीभेमध्ये असलेल्या रीसेप्टर्स ना इतके प्रभावित करतात, की हे वारंवार खाण्याचे व्यसन जडते. याच्या सेवनाने मधुमेह होण्याची शक्यता असते, तसेच यामुळे शरीरातील एड्रेनल ग्लैंड व्यवस्थित काम करू शकत नाही. तसेच यामुळे उच्चरक्तदाब, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. अजिनोमोटोच्या अति वापराने तोंडातील लाळ अधिक प्रमाणात स्रवते. ज्यामुळे पदार्थ अधिक चवीने आणि जास्त खाल्ला जातो. रक्तातील शर्करेचे प्रमाण त्यामुळे वाढते आणि स्थूलपणा हा सगळ्यात मोठा त्रास जाणवू लागतो.
अजिनोमोटो ही जपानमधील प्रख्यात कंपनी असून त्याद्वारे याची निर्मिती केली जाते. १९०८ साली शोध लागलेल्या अजिनोमोटोचा वापर जगातील अनेक देशात केला जात असला तरी भारतात वर्षाला ५ हजार मेट्रिक टन अजिनोमोटो आयात केले जाते. अजिनोमोटो हे एक प्रकारचे स्लो पॉयजन असल्याचे निष्कर्ष काढले गेले आहेत.एमएसजीचा वापर जो केवळ चायनीज पदार्थांमध्ये प्रामुख्याने होत होता, आता आपल्या घरात देखील वाढला आहे. बाजारातून आणलेले कोणतेही जंक फूड, इन्स्टंट तयार होणारे फूड तपासले तर यात अजिनोमोटोचा वापर झाल्याचे दिसून येत आहे.