श्री गणेश जयंती निमित्ताने महागणपती चरणी भक्तांची मांदियाळी

By Raigad Times    04-Feb-2022
Total Views |
ganesh jayanti
 
जेएनपीटी | कोरोनाचे संकट काही अंशी दुर झाल्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेर गावातील श्री महागणपती चरणी नतमस्तक होण्याचा योग भाविकांसाठी शुक्रवार दि ४ फेब्रुवारी रोजी आलेल्या श्री गणेश जयंती निमित्ताने जुळून आला.त्यामुळे श्री महागणपती चिरनेर चरणी नतमस्तक होण्यासाठी नवीमुंबई,ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेण व उरण येथील अनेक भक्तांनी आप आपल्या कुटुंबासह मंदिरात श्रीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत होते.यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी भरली होती.

ganesh jayanti 2
 
निसर्गरम्य डोंगर कुशीत वसलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर या गावावर निसर्ग देवतेची अविरत कृपा आहे.या गावातील जनतेने १९३० साली ब्रिटिश सरकार विरोधात सत्याग्रह पुकारुण देशाच्या स्वातंत्र्यासाठी गावकऱ्यांनी हुतात्म्ये पत्करले होते. गावात असणारे महागणपती देवस्थान चिरनेर गावचे ग्रामदैवत आहे. शिलाहार राजवटीत निर्मिलेले महागणपती मंदिर ततत्कालीन मुस्लिम आक्रमकांनी उध्वस्त केले मात्र तत्पूर्वी गणेशभक्तांनी महागणपतीची मूर्ती मंदिरा जवळील तलावात सुरक्षित लपवून ठेवली होती.तद्नंतर पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांना देवाने स्वप्नात येऊन मला तलावातून बाहेर काढ असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी तलावाचे खोदकाम करून मूर्ती बाहेर काढली.आणि नविन पाषाणी भव्य मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना केली.महागणपतीचे मंदिर पाषाणी,गोल घुमटाचे असून पूर्वाभिमुख आहे. मंदिरात स्थानापन्न असलेली महागणपतीची मूर्ती भव्य, चतुर्भुज, शेंदूर चर्चित असून पद्मासनात बसलेली आहे. मूर्तीच्या हाती खड्ग व पाश आहेत. मूर्ती सुमारे सहा फूट उंच व साडेतीन फूट रुंद आहे.
 
ganesh jayanti 3
 
नवसाला पावणारा गणपती म्हणून चिरनेर गावातील महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे.या गणेशाच्या दर्शनाला व हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेल्या भूमीचे दर्शन घेण्यासाठी नेहमीच भाविकांची व पर्यटकांची गर्दी असते, कोरोनाच्या संकटात नंतर श्री गणेश जयंती निमित्ताने योग भाविकांसाठी उघड्या झालेल्या मंदिरामुळे पुन्हा जुळून आला.त्यामुळे उरण, पनवेल प्रमाणे नवी मुंबई,ठाणे, कल्याण डोंबिवली, पेण मधिल भाविक मंदिरात दर्शनार्थ पहाटेच्या सुमारास ये- जा करत होते, भजन, किर्तन यामुळे मंदिर परिसरातील भक्तगन भावनिक वातावरणात तलीन झाले होते. येणाऱ्या भाविकांना देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
 
ganesh jayanti 4
यावेळी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर अनेक कुटुंबांना श्रीच्या दर्शना पासून वंचित राहावे लागले होते.त्यांची हि इच्छा यावर्षी शुक्रवार दि ४ फेब्रुवारी आलेल्या श्री गणेश जयंतीच्या सोहळ्या निमित्ताने पुर्ण झाल्याने अनेक भाविकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती.श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून मंदिर परिसरात ये- जा करणाऱ्या भाविकांनी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करावे अशा प्रकारच्या सूचना देवस्थानच्या कमिटी कडून भाविकांना देण्यात येत होत्या.