सोगांव । अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कनकेश्वर डोंगरावर आज सलग दुसर्या दिवशी भर दुपारीच वणवा भडकला आहे. वणवा विझवण्यासाठी वनविभागाचे वनपाल शिवाजी जाधव, वनरक्षक पंकज घाडी यांच्यासह स्थानिक वनप्रेमी प्रयत्न करत आहेत.
तीर्थक्षेत्र कनकेश्वर डोंगराला मंगळवार 15 मार्च रोजी वणवा लागला होता. वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक पंकज घाडी, विशाल पाटील व पर्यावरण प्रेमी संकेत कवळे यांच्यासोबत सामाजिक बांधिलकी जपत कूकुच कू कंपनीचे मालक कुणाल पाथरे यांनी साईश पाथरे व विवेक जोशी यांच्या सहकार्याने वणवा आटोक्यात आणली.
परंतु आज दुसर्या दिवशी भरदुपारीच पुन्हा एकदा वणवा भडकला.आजच्या वणव्याने खूप मोठा परिसर आपल्या कवेत घेतल्याने कालच्या पेक्षा आजचे होणारे नुकसान जास्त प्रमाणात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. डोंगरावरील विपुल प्रमाणात असणारी औषधी वनस्पती, अनेक प्रकारचे झाडे, प्राणी,जीवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे नुकसान न भरून येणारे आहेच,असे दिसत आहे. वणवाबाबतीत वनविभागाला कळविले असता कर्मचार्यांना त्वरित पाचारण करण्यात आल्याचे वनअधिकारी विकास तरसे यांनी सांगितले.
आज दुसर्या दिवशी वणवा विझवण्यासाठी वनविभागाचे वनपाल शिवाजी जाधव, वनरक्षक पंकज घाडी, विशाल पाटील, वनमजूर कोंढे, नागेश, केशव उपस्थित आहेत, तर यांना मदत करण्यासाठी पर्यावरणप्रेमी प्रसाद राऊत, संकेत कवळे यांच्यासोबत ग्रामस्थही साथ देत आहेत असे समजले.