अलिबाग । शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे येणार म्हणून रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जंगी तयारी केली होती. जागोजागी स्वागत कमानी उभारल्या होत्या. एक मोठी सभादेखील झाली. मात्र हे सगळं झाल्यानंतर आदित्य ठाकरे सुतारवाडीला तटकरे यांच्याकडे पाहुणचार घेण्यासाठी गेले अशी माहिती पुढे येत आहे.
शिवसेनेचे युवा नेते, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे आज (30 मार्च) रायगडात आले होते. महाड आणि माणगाव येथे विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी नेते सुभाष देसाई, मंत्री उदय सामंत तसेच शिवसेनेचे तिन्ही आमदार उपस्थित होते. बर्याच दिवसांनी रायगडात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शिवसैनिक जोरात होते.
सभा झाल्यानंतर आदित्य ठाकरे जाण्यास निघाले....
....मात्र जेव्हा आदित्य ठाकरे हे सुतारवाडीला जाणार असल्याचे समजले, तेव्हा शिवसेनेच्या आमदारांचे हातपाय गळाले. एकही आमदार त्यांच्यासोबत सुतारवाडी पर्यंत गेला नाही. काही वेळेपूर्वी उत्साहात असलेले शिवसैनिक निराश झाले. सुतारवाडीला गेल्यास शिवसैनिक नाराज होतील, असे सेना नेते सुभाष देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
पालकमंत्री आदिती तटकरे या जिल्ह्यात शिवसेनेसोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप करत पालकमंत्री हटविण्याची मागणी सेनेच्या आमदारांनी केली होती. यानंतरही शिवसेना नेत्यांकडून कुठलीही हालचाल झाली नाही. राष्ट्रवादीकडूनही झुकेगा नही...ची टॅगलाईन घेत या आमदारांना खिजविण्यात आले.
आज जेव्हा आदित्य ठाकरे रायगडात आले, तेव्हा ते या विषयावर काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा आमदारांसह शिवसैनिकांना होती. मात्र आदित्य यांनी या वादावर बोलण्याचे टाळल्याचे दिसून आले. सभ आटपून शवसैनिकांच्या गर्दीतून वाट काढत ते मार्गस्थ झाले. यानंतर आदित्य ठाकरे हे सुतारवाडीला तटकरे यांच्याकडे गेल्याची माहिती फिरु लागली आणि शिवसैनिकांना धक्काच बसला.
याबाबत खात्री करण्यासाठी सेनेचे आमदार आणि पक्षाचे नेते यांच्याकडून माहिती घेतली असता साहेब पुण्याला जाणार होते. मार्गात सुतारवाडीला थांबले किंवा नाही याबाबब माहिती नसल्याचे रायगड टाइम्सकडे बोलताना सांगितले.