कर्जत । तालुक्यातील शेलू गावातील रहिवाशी आणि नेरळ येथील वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अमृता ज्ञानेश्वर भगत ही महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पॉवर वूमन ठरली.
मुंबईच्या कामगार क्रीडा मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमृता हिने बाजी मारली आणि राष्टीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी निर्माण केली आहे. राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत क्लासिक क्रीडा प्रकारात ज्युनियर आणि सिनियर या दोन्ही गटात अमृता अव्वल ठरली.
नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अमृता ज्ञानेश्वर भगत ही विद्यार्थीनी क्रीडा क्षेत्रात अनेक पारितोषिके मिळावीत आहे. जिल्हा आणि विभागीय पातळीवर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पॉवर वूमन ठरलेल्या अमृता हिला महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. मुंबईतील कामगार क्रीडा मैदानात महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत ग्रामीण भागातून तेथे पोहचलेली अमृता हिने आपल्या कामगिरीत पुन्हा एकदा कमालीचे सातत्य दाखवीत पॉवर वूमन ठरली. स्पर्धेतील आपल्या गटाचे प्रथम पारितोषिक आणि पॉवर वूमन हा बहुमान तिने मिळविला. अमृता च्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून नेरळ येथील विद्या मंदिर मंडळाच्या सुमती टिपणीस महाविद्यालयात तिच्या यशाबद्दल मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.