कर्जत | कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील तुंगी या डोंगरावर वसलेल्या गावी कोणतेही वाहन जात नव्हते. त्या गावात मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी वन विभागाची परवानगी घेऊन रस्ता नेला.दरम्यान,त्या दुर्गम गावात खासदार श्रीरंग बारणे हे आपले वाहन घेऊन पोहचले. त्यावेळी ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली आणि एकच जल्लोष केला.
डोंगरातील सुकळ्यावर वसलेल्या आणि १५० वर्षे डोंगर चढून जाणे हीच वाट असलेल्या तुंगी गावाच्या ग्रामस्थांचे नशीब बदलले आहेत. डोंगरपाडा आणि खांडस या गावाच्या समोर डोंगरावर असलेल्या आणि आजूबाजूला वन जमिनीचा विळखा असलेल्या तुंगी गावात २०१८ मध्ये वीज पोहचली आहे. आता त्या ठिकाणी खासदार श्रीरंग बारणे यांनी रस्ता पोहचवण्याचा निर्धार केला आणि त्या ग्रामस्थांचे ते स्वप्न सत्यात उतरत आहे.
१५०० मीटर लांबीचा डोंगरातून जाणारा रस्ता वन विभागची परवानगी घेऊन डोंगरातील दगड फोडून रस्ता बनवला जात आहे.दरम्यान,मिनी माथेरान म्हणून ओळख असलेल्या तुंगी गावाच्या परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी खासदार बारणे यांचा निर्धार यानिमित्ताने पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत मधील तुंगी गावाला वीज नसल्याने तेथे वन जमिनीतून विजेचे खांब टाकण्याची परवानगी मिळविली आणि २६ जानेवारी २०१८ रोजी तुंगी गावात वीज पोहचली. त्यावेळी खासदार बारणे यांनी आपण तुंगी गावात पोहचणार आणि ते देखील गाडी घेऊन असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार खासदार बारणे यांनी १५०० मीटर लांबीचा रस्ता डोंगर फोडून करावा लागणार असल्याने खांडस तसेच डोंगर पाडा भागातील वन विभागाच्या ताब्यातील जमीन मिळावी म्हणून भोपाळ येथून मंजुरी आणली आणि रस्त्याचा मार्ग मोकळा झाला.
खांडस ग्रामपंचायत मधून अँभेरपाडा ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट झालेल्या तुंगी गावातील रस्त्यासाठी खासदार बारणे यांनी आदिवासी विकास विभाग आणि खासदार निधी उपलब्ध करून देत अवघड असे डोंगर फोडून रस्ता बनविला जात आहे.
या रस्त्यासाठी पाथरज वन क्षेत्र मधील ०.४५ हेक्टर तर खांडस येथील वन क्षेत्रातील ०.०८ हेक्टर जमीन मिळविण्यात आली आहे. खासदार निधी तसेच आदिवासी विकास विभाग यांच्या निधीमधून १५०० मीटर लांबीचा रस्ता पाथरज ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा पाझर तलावाच्या मागे असलेल्या रस्त्याने तुंगी गाव जोडले जाणार आहे. तर १५०० मीटर पैकी ९०० मीटर चा रस्ता पूर्णपणें दुर्गम भागातील असल्याने तेथे पावसाळ्यात होणारे प्रचंड पर्जन्यमान लक्षात घेऊन १० ठिकाणी पाईप टाकून पाण्यासाठी मार्ग ठेवण्यात आले आहेत.
तीन मीटर रुंदीचा रस्ता बनविला जात असल्याने तुंगी गाव आता जगाशी जोडले जाणार आहे. पुणे जिल्ह्याच्या हद्दीला लागून असलेल्या तुंगी गावाच्या आजूबाजूचा डोंगर हा पर्यटनासाठी काश्मीर समजला जातो. पावसाळ्यात सतत धुक्यात गुडुब होणारा हा परिसर मिनी माथेरान म्हणून ओळखले जाते.
तुंगी गावाला जाणारा दुर्गम भागातील रस्ता तयार झाल्यानंतर २३एप्रिल रोजी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपले वाहन घेऊन तुंगी गावात प्रवेश केला. तुंगी गावातील ग्रामस्थांनी खासदार बारणे यांची ढोल ताशे यांच्या गजरात मिरवणूक काढली. त्यावेळी खासदार बारणे यांनी गावातील हनुमान मंदिरात जाऊन श्रीफळ वाढविला.
डोंगरपाडा गाव येथून खासदार बारणे यांचे स्थानिक ग्रामस्थांनी स्वागत केल्यानंतर नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरून खासदार बारणे यांनी फॉर्च्युनर हि गाडी डोंगर चढू लागली आणि काही मिनिटात तुंगी गावात पोहचली. त्यावेळी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला आणि गावातून ढोल ताशे यांच्या गजरात मिरवणूक काढली.
खासदार बारणे यांनी यावेळी बोलताना आपण २०१८ मध्ये शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्यासाठी रस्त्यासाठी वन जमीन मिळावी म्हणून प्रयत्न केले. वन जमीन मिळाल्यावर आदिवासी विकास विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी ५० लाखाचा निधी मंजूर करून घेतला. तरी देखील निधीची कमतरता असल्याने खासदार निधी उपलब्ध करून दिला अशी माहिती दिली.
त्याचवेळी तालुक्यात वन विभागामुळे अद्याप वीज पोहचली नसलेल्या दुर्गम भागातील गावात आणि वाड्यांना वीज आणि रस्ता पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. तर नव्याने डोबगार फोडून रस्ता तयार करण्यात आल्याने कोणीही अवजड वाहने तुंगी पर्यंत नेऊ नयेत असे आवाहन खासदार बारणे यांनी यावेळी केले आहे.