वावे येथे जमीन घोटाळा; फसवणूक प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....

By Raigad Times    17-May-2022
Total Views |
land froud
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील वावे गावातील शेतकर्‍यांनी आपली जमीन मुंबई वांद्रे येथील व्यक्तीला विकली होती. मात्र त्या जमिनीचे विक्री करार चार वर्षात त्या दोन तरुणांनीं केला नाही आणि त्यामुळे २४ लाखाहून अधिक रक्कम देणार्‍या त्या व्यत्कीने आपली फसवणूक झाल्याबद्दल कर्जत पोलीस ठाणे गुन्हा दाखल झाला आहे.
 
दरम्यान, २४ लाख रुपये घेऊन जमिनीची विक्री व्यवहार पूर्ण न करणार्‍या वावे गावातील त्या दोन तरुणांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
 
कर्जत तालुक्यातील वावे गावातील अनिल राम ठाणगे आणि संतोष बळीराम ठाणगे यांनी आपल्या गावातील सर्वे नंबर २/५ अ मधील ३९ गुंठे जमीन नवी मुंबई येथील फिलिप डिसुझा यांना विकण्याचा साठे करार एक जानेवारी २०१८ मध्ये केला होता.
 
त्यानंतर त्या दोघांनी डिसुझा यांच्याकडून वेगवेगळ्या वेळी चेक च्या माध्यमातून ४५ लाख ५० हजार एवढी रक्कम घेतली, परंतु जमीन विक्रीचा व्यवहार पूर्ण केला नाही. त्याबद्दल डिसुझा यांनी त्या दोन्ही तरुणांकडे जमीन नावावर करून देण्यासाठी अनेक वेळा भेट घेऊन विनंती केली.
 
मात्र प्रत्येक वेळी त्या दोन तरुणांनी वेगवेगळी करणे पुढे करून जमिनीचा व्यवहार पूर्ण केला नाही. त्यामुळे शेवटी फिलिप डिसूजा यांनी कर्जत दिवाणी न्यायालयात धाव घेऊन आपली फसवणूक झाली असल्याचा अर्ज दाखल केला.
 
त्या अर्जावर अनेकदा सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाला डिसुझा यांची फसवणूक झाली असल्याचे म्हणणे पटले आणि त्यानंतर न्यायालयाने कर्जत पोलीस ठाणे यांना आदेश देऊन गुन्हा दाखल करायला सांगितले.
 
त्यानुसार कर्जत पोलीस ठाणे येथे वावे गावातील जमिनीचा विक्री व्यवहार पैसे घेऊन पूर्ण न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
वावे गावातील दोन तरुणांवर कर्जत पोलीस ठाणे येथे फसवणूक प्रकरणी ४१९, ४२० नुसार गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनावणे अधिक तपास करीत आहेत. कर्जत पोलिसांनी या जमीन घोटाळा प्रकरणी कोणालाही अटक केली नाही.