अलिबाग । अलिबाग येथील जेटीवर नांगरुन ठेवलेल्या मच्छिमार बोटीला उधाणाचा फटका बसला आहे. उधाणाच्या पाण्यामुळे बोटीच्या नांगराचे पाग तुटले आणि ही बोट लाटांमध्ये सापडली. यात दगडावर आदळून या बोटीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
आज (17 मे) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आक्षी साखर कोळीवाड्यातील मच्छिमार संतोष किसन खुलाबकर यांची ही बोट आहे. ‘सागर कृपा’ नामक ही बोट खुलाबकर यांनी अलिबाग येथील जेटीवर नांगरुन ठेवलेली होती. आज दुपारी समुद्राला आलेल्या उधाणाच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने, बोटीच्या नांगराचे पाग तुटले आणि बोट लाटांच्या मार्यात सापडून दगडावर आदळली.
या दुर्घटनेमध्ये बोटीचे सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छिमार संतोष खुलाबकर हे हवालदिल झाले आहे. या मच्छिमार बोटीवरच त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचे पोट अवलंबून, असल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.
पावसाळा तोंडावर असताना या बोटीचे नुकसान झाल्याने, खुलाबकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यांच्या बोटीचा विमा, व्हीआरसी काढलेले असून, आपत्कालीन योजनेमधून त्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने ही बोट बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.