म्हसळा । म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात सिमेंटच्या ट्रकला उतारातील वळणावर ब्रेक न लागल्याने अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.
आज (24 मे) सकाळी ही दुर्घटना घडली. एम.एच.05 ए. एम.3202 या क्रमांकाचा ट्रक तुर्भे येथून अल्ट्राटेक कंपनीचे सिमेंट घेऊन श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथे जात होता. हा ट्रक घोणसे घाटातील एका घातक वळणावर आल्यानंतर ट्रकचा ब्रेक फेल होऊन हा अपघात झाला.
या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या अपघाताच्या ठिकाणी बस पलटी होऊन चार जणांचा मृत्यू झाला होता.