माणगाव | माणगावपासून ४ किमी अंतरावर असणार्या तिलोरे गावच्या हद्दीत इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ महिंद्रा बोलेरो पीकअप टेम्पोला भरधाव वेगात येणार्या टेम्पोने विरूद्ध दिशेला येत समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बोलेरो पिकअप टेम्पोवरील चालकाला गंभीर दुखापत होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला.
सदरील अपघात शनिवार दि.७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला.या अपघाताची फिर्याद भारत नथुराम पाटोळे ( वय -४०) रा. नाणोरे ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,या अपघातातील मयत मनिष कृष्णाजी गोखले (वय-५०) रा. सौदाले ता.देवगड जि.सिंधुदुर्ग हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो क्र. MH ०७ P १३७३ ही गाडी मुंबई - गोवा महामार्गाने मुंबई बाजूकडून माणगाव बाजूकडे स्वतः चालवीत घेऊन जात होता.
त्याचवेळी समोरून माणगाव बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा भारत बेंझ कंपनीचा टेम्पो क्र. MH ०७ AJ २५५५ या गाडीवरील चालक आरोपी महादेव रामचंद्र परब ( वय -३९) रा.तळवडे ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग याने त्याच्या ताब्यातील टेम्पो हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवुन रस्त्याच्या विरूद्ध दिशेला येऊन महिंद्रा बोलेरो पीकअप टेम्पोला मधोमध जोरदार धडक दिली.
या अपघातात बोलेरो पीकअप टेम्पो चालकाला गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला.या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.या अपघाताची माहिती समजताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील यांनी अपघात ठिकाणी भेट दिली.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. ११३/२०२२ भादवि संहिता कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८ मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ प्रमाणे करण्यात येऊन आरोपी टेम्पो चालक महादेव परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किर्तिकुमार गायकवाड हे करीत आहेत.