"संजय राऊतांसारखा प्रवक्ता कोणत्याच पक्षाला मिळू नये"

बंडखोर आमदार दीपक केसरकर यांचा राऊतांवर घाणाघात

By Raigad Times    27-Jun-2022
Total Views |
deepak kesarkar
रायगड । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाची निशाणी फडकवल्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. बंडखोरांविरुद्ध शिवसैनिक पटून उडल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, नेते आक्रमक झाल्याचेही दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपाचे सिलसिले सुरू झाले आहेत. यातच आता शिंदे गटात सामील झालेले आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर घाणाघाती टीका केली आहे. राऊत यांची शिवराळ भाषा सहन केली जाणार नाही. कोणत्याही पक्षाला असा प्रवक्ता मिळू नये' असे केसरकर यांनी म्हटले आहे.
 
 
विधिमंडळातील शिवसेनेच्या ५५ आमदारांचे नेतृत्व सध्या एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे १४-१५ आमदारांची बैठकीमध्ये त्यांना गटनेते पदावरून काढणे बेकायदेशीर आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव असताना त्यांनाही आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार उरत नाही.
 
बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस ही नियमानुसार ७ दिवसांची असते. परंतू आम्हाला ४८ तासांची देण्यात आली आहे. यासर्व बेकायदेशीर गोष्टींविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे
 
'सर्व आमदारांमध्ये राऊतांविरोधात तीव्र संताप आहे. ते आमदारांच्या मतावर निवडून आले आहेत. आमदारांना प्रेत म्हणण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. राऊतांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मदतीने निवडून यावे. त्यांना त्यांचा चांगला सपोर्ट आहे. त्यानंतर त्यांनी आमच्यावर बोलावं.'
 
'राऊतांनी किती बापाचे... असे आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे त्यांनी महिलांचाही अपमान केला आहे. शिवसेनेसारखा छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या पक्षामध्ये राहून राऊत अशी भाषा कशी वापरू शकतात? बाळासाहेब असते तर एका मिनिटात मातोश्रीवरून राऊतांना बाहेर काढले असते.' असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.