"पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची खरी जागा दाखवून देऊ"

पालीत शिवसैनिकांची जाहीर निषेध सभा संपन्न

By Raigad Times    28-Jun-2022
Total Views |
pali
सुधागड/पाली । पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची खरी जागा दाखवून देऊ. तसेच जिल्ह्यातील स्थानिक आमदारांना पराभवाचे पाणी पाजू अशा शब्दांत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. आज (२८ जून) रोजी शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांच्या नेतृत्वाखाली पाली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जाहीर निषेध सभा संपन्न झाली. यावेळी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
 
 
शिवसेनेशी गद्दारी करून आपल्यासह इतर आमदारांना आसाम गुवाहाटी येथे पळून घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचा, तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले यांचा शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला. शिवसेनेच्या ताकदीवर निवडून येणार्‍या रायगडातील तिन्ही आमदारांना आगामी निवडणुकांमध्ये पराभवाचे पाणी पाजू तसेच पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची खरी जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन किशोर जैन यांनी यावेळी केले.
 

pali 
 
 
यानंतर संतप्त शिवसैनिकांनी पाली शहरात निषेध मोर्चा काढून त्यांच्या बंडखोर आमदारांविरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला. तसेच बंडखोरांना राजीनामे देऊन निवडणुकीत उतरण्याचे आव्हान करणारे फलक झळकवण्यात आले. अशा प्रकारे शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला.
 
 
यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, सुधागड तालुका प्रमुख मिलिंद देशमुख, माजी जिल्हा प्रमुख विष्णभाई पाटील, राजेंद्र राऊत, नंदू सुतार,नगरसेवक सचिन जवके, रवींद्र खंडागळे, किशोर खरीवले, सचिन डोबले, आशिष यादव यांच्यासह यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण, वाहतूक सेनचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.